गडहिंग्लज : आपल्या फिल्म करियरमध्ये दक्षिणेतील मल्यालम् दिग्दर्शकांनी आपणास भूमिका साकार करण्यास संधी दिली नाही, अशी खंत ख्यातनाम सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. योग्य संधी मिळाल्याने मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीस आपण विशेष योगदान दिले आहे. दक्षिणेतील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी मात्र आपणास संधी देणे अपेक्षित होते, मात्र असे घडले नाही. याकडे लक्ष वेधत पाटेकर यांनी मिश्किल शैलीत टिपणी केली.केरळ, त्रिवेंद्रम येथे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी नेहमीच्या शैलीत चौफेर टोलेबाजी केली.
नाना पाटेकर म्हणाले, मला जर संधी मिळाली तर नक्कीच मल्यालम चित्रपटात काम करेन. भारतीय सिने सृष्टीत आपण गेली तीन दशके योगदान दिले आहे. परंतु एकाही दक्षिणेतील चित्रपट निर्माता व दिग्दर्शकाने आपल्याशी संपर्क साधला नाही. त्यामुळे आपण व्यथित झालो असल्याचे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ते म्हणाले जर दक्षिणेतील निर्माते जर मला अभिनेता म्हणून स्वीकारणार असतील तर मी त्या दृष्टीने माझ्या भूमिका मध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करेन.
सिनेमात भाषेपेक्षा आशय महत्वाचा
नाना म्हणाले, केरळची संस्कृती महान आहे. केरळ मध्ये कोणताही बदल झालेला नाही. मी अनेक वेळा शूटिंग साठी केरळ मध्ये आलो आहे. सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या केरळ राज्य पूर्वीप्रमाणेच आहे, अशी पुस्तीदेखील त्यांनी जोडून केरळच्या जनतेचे आणि सिनेमांचे भरपूर कौतुक केले. आपण कोणत्या भाषेत सिनेमे बनवतो यापेक्षा त्यातील आशय महत्वाचा असतो. भाषेपेक्षा वस्तुस्थितीचे भाष्य चित्रपटांच्या माध्यमातून मांडता येते असे देखील ते म्हणाले.
दोन्ही राज्यांच्या संस्कृतीत सहकार्य, आपुलकी, प्रेम
नाना म्हणाले, मी महाराष्ट्रातून आलो असलो तरी मला केरळच्या जनतेने केलेल्या स्वागताने मला केरळ आपले घरच वाटते. महाराष्ट्र आणि केरळची भाषा जरी वेगळी असलीतरी या दोन्ही राज्यांची संस्कृती मिळती जुळती आहे. दोन्ही राज्यांच्या संस्कृतीत सहकार्य, आपुलकी आणि प्रेम हा समान धागा आहे. यावेळी त्यांनी दक्षिणेतील सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते अदूर गोपाळकृष्णन यांच्या निवासस्थानी भेट देऊन हितगुज केले. आपल्य्साठी केरळ दौरा आणि सिनेसृष्टीच्या दृष्टीने ही अविस्मरणीय भेट ठरल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले.
दक्षिणेतील चित्रपटात लवकरच संधी दिली जाईल – अदूर
यावेळी मळ्यालम चित्रपट निर्मात्यांनी नाना पाटेकर यांच्या विविध अदाकरी आणि हिंदी चित्रपटातील भूमिका यासह भारतीय सिने सृष्टीतील नाना पाटेकर यांच्या योगदानाबद्दल आनंद व्यक्त केला. नाना पाटेकर यांना दक्षिणेतील चित्रपटात विशेष भूमिका साकार करण्यासाठी संधी दिली जाईल असे देखील अदूर यांनी स्पष्ट केले. यावेळी दक्षिणेतील चित्रपट निर्माते, अभिनेत्री सारा अली खान, अभिनेता यश यांच्यासह भारतीय सिने सृष्टीतील मान्यवर, सेलिब्रिटी व मान्यवर इफि चित्रपट महोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते. मी गेली पाच दशके भारतीय फिल्म सृष्टीशी जोडलो गेलो आहे. हिंदी, मराठी भाषेतील चित्रपटात योगदान दिले आहे, मात्र आपणास दक्षिणेतील चित्रपट सृष्टीत संधी दिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.