सौजन्य - नवराष्ट्र टीम
यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रतीबंधात्मक कारवाई करून काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. महाज्योतीसाठी १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर झाल्याची घोषणा होऊनही अद्याप विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या निष्क्रियतेविरोधात भाजप युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
आंदोलनादरम्यान “निधी मंजूर — पण पैसे कुठे?”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा”, “महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.“ महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडवली. त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नसेल, तर ही सरकारची लाजीरवाणी बाब आहे. निधी मंजूर होऊनही पैसे वितरित होत नसतील, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल आंदोलकांनी केला आहे.
आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी सांगितले की, तीन वर्षांपासून अधिछात्रवृत्ती व विद्या वेतन थकीत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कर्ज काढावे लागत आहे, काहींना शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न उदासीनतेमुळे उद्ध्वस्त होत आहे. या आंदोलनात भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, सरचिटणीस ओंकार कड्डे, अमर बुदगुडे, अबासाहेब थोरात, संदीप केसकर, रसिका सणस, सोहेल शेख, परशुराम तागुंदे, शुभम शिंगाडे, शुभम रानावरे, लखन गोळे, निलेश लांडगे, सुयोग सावंत, रघु चौधर, सोपान बागडे ,विकास मळेकर, सचिन उभे, शिवानी चौधरी, महादेव सुळ, जयराम शिंगाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पोलिस निरीक्षक जीवन शेट्टी यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन बारामती शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून दोन तासानंतर त्यांना सोडून दिले.
कालबद्ध व पारदर्शक यंत्रणा लागू करावी
महाज्योती संस्थेतील १२६ कोटी रुपयांची थकीत अधिछात्रवृत्ती व विद्या वेतन तात्काळ अदा करावे, मंजूर निधीचा तात्काळ वितरण आदेश काढून रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी. भविष्यात विद्यार्थ्यांना अशी अडचण येऊ नये, यासाठी कालबद्ध व पारदर्शक यंत्रणा लागू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.






