तुकाराम मुंढेंना 'क्लिन चिट'; आमदार खोपडेंनी केलेली 'ती' मागणीही फेटाळली
मुंबई : आयएएस तुकाराम मुंढे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी आमदाराकडून करण्यात आली होती. मुंढे हे त्यावेळी नागपूर महापालिकेचे आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ होते. याच पदावर असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या आरोपानंतर चौकशी होऊन त्यांना क्लिन चिट मिळाली असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच, महिला अधिकाऱ्यांशी गैरव्यवहारप्रकरणी येत्या महिनाभरात अहवाल आल्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. मुंढे यांची पोलिस महासंचालक व मुख्य सचिवांमार्फत चौकशी करून बडतर्फ करावे, अशी मागणी आमदार खोपडे यांनी केली होती. मात्र, ती मागणी आता फेटाळण्यात आली आहे. खोपडे म्हणाले, मुंढे यांनी महानगरपालिकेच्या ७ महिन्यांच्या काळात रूजू होताच १७ सफाई कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले.
हेदेखील वाचा : IAS Tukaram Mundhe : 20 वर्षात तब्बल 24 वेळा बदली; आता तर थेट राजीनाम्याची मागणी, ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं
तसेच, त्यानंतर कोविड काळात नागपूरजवळील एका मोकळ्या ठिकाणी ५ हजार बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारले. वादळ वाऱ्याने ते उद्ध्वस्त झाले. परिणामी, कोट्यवधींचे नुकसान झाले तर, स्मार्ट सिटीचे कार्यकारी सीईओ असताना त्यांनी एका कंत्राटदाराची ४० कोटींची देयके मंजूर केली. त्यांना धनादेशावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी मंजुरी दिली, हे बेकायदेशीर होते.
स्मार्ट सिटीतच कार्यरत दोन महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली. या दोन्ही महिलांनी त्यांच्याविरोधात सदर पोलिसांत तक्रार दिली. या सर्व प्रकरणी तत्कालीन महापौर व विद्यमान आमदार संदीप जोशी यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती. तसेच सदर पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने गुन्हाही दाखल केला. आमदार प्रवीण दटके यांनी २०२० मधील प्रकरणात आता त्यांनी मंजूर केलेल्या कामांना कार्योत्तर मंजुरी का दिली? असा प्रश्न उपस्थित करत भ्रष्टाचारप्रकरणी पोलिस व ईओडब्ल्यूच्या चौकशीचे अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी केली.
चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई होणार
मंत्री सामंत यांनी मुंढे यांना स्मार्ट सीईओ म्हणून काम करण्याचे अधिकार बृहन्मुंबईचे तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले. तसेच, त्यांच्या पदभाराचेही पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी असल्याचे सांगितले. २ चौकशीत मुंढे निर्दोष निघाले तर, महिला गैरव्यवहारप्रकरणी राधिका रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात हा अहवाल आल्यानंतर यातील तथ्यानुसार कारवाई होईल, अशी ग्वाही दिली.






