मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक कऱण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात नव्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर उत्तर सादर करण्यासाठी ईडीकडून वेळ मागण्यात आला.
‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. याआधीही मलिक यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. प्रत्येकवेळा अर्ज फेटाळण्यात आला.
[read_also content=”आमदार महेश लांडगे- महापालिका आयुक्तांची मॅरेथॉन बैठक; प्रलंबित प्रश्नांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याच्या सूचना https://www.navarashtra.com/maharashtra/mla-mahesh-landge-marathon-meeting-of-municipal-commissioners-instructions-for-sending-proposals-of-pending-questions-to-the-state-govt-nrdm-304613.html”]
आता मलिक यांनी नव्याने अर्ज दाखल केला असून जवळपास पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेनेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिक यांनी याचिकेत केला आहे. मागील सुनावणीदरम्यान, तपास यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, विशेष सत्र न्यायालायात सुनावणी सुरू झाल्यानंतर ईडीकडून उत्तर सादर करण्यासाठी आणखी वेळ मागण्यात आला त्याची दखल घेत न्यायालयाने सुनावणी १९ जुलै रोजी निश्चित केली.