मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
जालना : मागील दोन महिन्यांपासून बीडभोवती राज्याचे राजकारण रंगते आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामुळे बीडसह संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे नाव समोर आले होते. वाल्मिक कराडसोबत मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप महायुतीच्या भाजपचे नेते व आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र आता या दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चार तास भेट झाल्यामुळे राजकारण रंगले आहे. यावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिक घेतली आहे.
सुरेश धस यांनी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था नसल्याची टीका केली होती. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर राजकारणासह वैयक्तिक टीका देखील केली होती. आमदार सुरेश धस यांनी आका म्हणत अनेक आरोप केले होते. मात्र नंतर आता धनंजय मुंडे व सुरेश धस यांची भेट झाल्यामुळे टीकेची झोड उठवली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरेश धस यांच्या इतका विश्वासघातकी या पृथ्वीतलावर होऊ शकत नाही, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इतक्या क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जातात. त्यांच्या लोकांनी खून घडून आणला, त्याला एकदाही देशमुख कुटुंबियाकडे यावे नाही वाटले. तुम्हाला कोणती एवढी माया सुटली की, तुम्ही त्यांना भेटायला गेलात? इतक्या क्रूर माणसाला जर तुम्ही भेटायला जात असाल, तर या गोरगरीब मराठ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? असा सवाल जरांगे पाटील यांनी सुरेश धसंना केला. तुमच्या राजकारणासाठी, एखाद्या पदासाठी आणि स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे हिंडता आणि देशमुख कुटुंब मात्र उन्हात पडले. इकडे तिकडे हिंडायचं असेल तर यामध्ये यायचेच नाही, अशा शब्दांत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांना खडेबोल सुनावले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, सुरेश धसांना इकडे समाजाची वाहवा करून घ्यायला पाहिजे, समाजाच्या पाठीवर हात फिरवायला पाहिजे आणि राजकारण पण करायचे. मला वाटते त्यांनी काहीतरी एकच करावे. सुरेश धसांना फक्त मोठेपणा घ्यायची हाव आहे. ज्याने माणसं कापून टाकली, तुम्ही त्यांना भेटायला जाता. मराठ्यांनी तुमच्यावर खूप विश्वास टाकला, गोरगरीब मराठ्यांच्या तोंडात माती टाकता का? तुम्हाला त्यांचे तोंड बघायची गरज काय होती? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसा खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडणी मागण्यापेक्षा कट रचणारा दोषी असतो, तसाच सुरेश धस दोषी असेल, अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी जहरी टीका केली. आहे.