Devendra Fadnavis Marathi News: बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजपचे आमदार सुरेश धस हे गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आरोपींच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण या प्रकरणातून हटणार नाही, असे म्हणत आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप केले होते. त्यातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
विशेष म्हणजे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही धस यांच्यावर हल्लाबोल करत धस यांनी दगाफटका केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, आमदार धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत, तर सत्ताधारी आपली बाजू मांडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातून प्रतिक्रिया देत विरोधकांना टोलवले. या भेटीने कुठलाही फरक पडत नाही, असे ते म्हणाले.
कोण कुणाला भेटलं याच्यावर राजकारण होत असेल तर ते लोकशाहीमध्ये योग्य नाही, लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे. बीडमधील हत्याप्रकरणात मी खंबीर भूमिका घेतलेली आहे. खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तोडून टाकायचा असं करण्याची आवश्यकता नाही. धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत, एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटल्याने कुठलाही फरक पडत नाही. सुरेश धस यांनी देखील सांगितला आहे की, भेट घेतली तरी हेतू एकच आहे की सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तोच हेतू घेऊन सुरेश धस काम करत आहेत. मात्र, काही लोकांच्या पोटात दुखते, त्यामुळे ते यावर टीका करतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीवर दिली आहे.
मुंबईत मराठी शाळांची टक्केवारी घसरली त्याबद्दल देखील देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, कुठल्याही मराठी शाळा बंद होणार नाही, याबाबत सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत. शाळा इंग्रजी असो की हिंदी असो त्यांना मराठी शिकवावे लागणार आहे. त्याची सक्ती आपण केलेली आहे. या सक्तीचे ते योग्य प्रकारे पालन करत आहेत की नाहीत याकडे आमचे लक्ष आहे. त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावे लागेल, अशा पद्धतीचा आपण निर्णय घेतला असल्याचे सांगितले.