Photo Credit : Social Media
सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकारण चांगलचं तापलं आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक राज्यकर्त्यांच्या घर, कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तर वातावरण अधिकच चिघळले आहे. अशातच सोलापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांचाही ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बार्शीतील टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी रोखली. गाडीच्या समोर आलेल्या आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. तसेच, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर शरद पवारा गाडीतून बाहेर उतरले आणि आंदोलकांचे म्हणणेही ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी “मराठा आरक्षणाला आपला पाठींबा आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांनी पवारांची गाडी सोडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती.
दरम्यान, बार्शीत सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थिती मेळावा आणि नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार संमारंभ पार पडणार आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत ते बार्शीत असतील. तर सायंकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी समाजाच्या मेळाव्यालाही ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शनिवारी (10 ऑगस्ट) भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनाही एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी अडवत आरक्षणासाठी तुम्ही काय केलं, आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो, असा जाब विचारला. तसेच, वेळेत आरक्षण दिले तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्या विरोधात अशा शब्दांत आंदोलकांनी अशोक चव्हाम यांना इशारा दिला आहे.