Maharashtra Breaking News
05 Nov 2025 09:59 AM (IST)
हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा “एक दीवाने की दिवानियत” हा चित्रपट स्पष्टपणे एक डार्क हॉर्स ठरला आहे. दिवाळीत लोकप्रिय हॉरर कॉमेडी “थामा” सोबत टक्कर होऊनही हा चित्रपट हिट होईल असे कोणी विचार केला होता? आणि आता मनोरंजक गोष्ट म्हणजे, “एक दीवाने की दिवानियत” हा चित्रपट आयुष्मान खुराणा अभिनीत “थामा” पेक्षा खूपच कमी स्क्रीनवर प्रदर्शित झाला. तरीही, त्याने बॉक्स ऑफिसवर असाधारण कामगिरी केली आणि दमदार कलेक्शन केलेआहे. “एक दीवाने की दिवानियत” ने रिलीजच्या १५ व्या दिवशी, दुसऱ्या मंगळवारी किती कमाई केली हे आपण आता जाणून घेणार आहोत.
05 Nov 2025 09:50 AM (IST)
पुणे: पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. काही दिवसांपूर्वी गणेश काळे नावाच्या रिक्षाचालकाची भरदिवसा हत्या झाली होती. या खुनाचा उलगडा पोलीस करतच होते तर भरदिवसा पुन्हा एक हत्या झाली आहे. आता वाहतुकीने कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या बाजीराव रस्त्यावर अल्पाईन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून तिघेही अल्पवयीन आहेत. गेल्या तीन दिवसात भरदिवसा झालेली ही दुसरी हत्या आहे.
05 Nov 2025 09:45 AM (IST)
भारतात आयफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. आयफोन लाँच झाल्यानंतर त्याची खरेदी करण्यासाठी अॅपल स्टोअर बाहेर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे आयफोनच्या भारतातील विक्रीला काही तोड नाही. आता नुकताच एक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल वाचून सर्वचजण चकित झाले आहेत.
05 Nov 2025 09:40 AM (IST)
अभिनेता इमरान मुस्लिम कुटुंबातून आलेला आहे, तर त्याची पत्नी परवीन साहनी हिंदू आहे. आपल्या मुलाच्या धर्माबद्दल बोलताना इमरानने एक आश्चर्यकारक विधान केले. “मी परवीनशी लग्न केले, जी हिंदू आहे. म्हणून, आमचा मुलगा पूजा करतो आणि नमाजही वाचतो. विशेष म्हणजे माझी आई ख्रिश्चन होती.” असे अभिनेता म्हणताना दिसला आहे.
05 Nov 2025 09:35 AM (IST)
भारतात 5 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,245 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,224 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,183 रुपये आहे. भारतात 5 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,12,240 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,450 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,830 रुपये आहे. भारतात 5 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 150.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,50,900 रुपये आहे.
05 Nov 2025 09:30 AM (IST)
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमीन, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, वैयक्तिक नुकसान तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत नागपूर विभागात झालेल्या नुकसानीपोटी 474 कोटी रुपये आणि इतर असे सर्व मिळून 985 कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली.
05 Nov 2025 09:25 AM (IST)
बिलासपूर रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात मृतांची संख्या ११ वर पोहोचली असून, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पॅसेंजर ट्रेनने लाल सिग्नल तोडून मागून येणाऱ्या मालगाडीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रेल्वेने या घटनेची चौकशी सुरू केली असून सिग्नलिंग सिस्टीम तसेच चालकाच्या चुकांची सखोल तपासणी केली जात आहे.
05 Nov 2025 09:20 AM (IST)
अंधेरी-वर्सोवा परिसरात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चाचा नेहरू गार्डनजवळील लष्करिया बिल्डिंगच्या मागे रस्त्यालगतच्या वॉलकंपाऊंडजवळ अंदाजे एक महिन्याच्या बालिकेला कचऱ्यात टाकून दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बालिकेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासात, पालकांनी किंवा मुलाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने हेतुपुरस्सर परित्याग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
05 Nov 2025 09:15 AM (IST)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. उत्तर पुण्यात प्रभाव असलेले देशमुख कुटुंब शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा पक्षप्रवेश गुरुवारी चाकण येथे होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत असून, या घडामोडीमुळे पक्षातील गळतीचा क्रम कायम राहिला आहे.
05 Nov 2025 09:10 AM (IST)
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून वितरित होणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये या वेळीही थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
05 Nov 2025 09:06 AM (IST)
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यभरात २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर केले जातील. त्यामुळे पुढील महिनाभरातच सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचाराची रणनीती आखावी लागणार आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान दुबार मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील त्रुटींविषयी पत्रकारांनी निवडणूक आयुक्त वाघमारे यांना प्रश्न विचारले. मात्र, आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
05 Nov 2025 09:02 AM (IST)
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीवरील वाद आता उच्च न्यायालयाच्या दारात पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास तात्पुरती मनाई केली असून, निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेचे भवितव्य 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर ठरणार आहे.
या निवडणुकीविरोधात एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी अॅड. स्नेहा फेणे यांच्या माध्यमातून रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत निवडणूक प्रक्रियेत घटनेचे उल्लंघन झाल्याचा आणि नियमबाह्यरीत्या 155 हून अधिक क्रिकेट क्लबना मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Marathi Breaking news live updates: शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने ठार मारण्यात यश मिळवले आहे. रात्री उशिरा गाव परिसरात शोधमोहीम सुरू असताना ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा मागोवा घेण्यात आला.
वन विभागाच्या पथकाने बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न केला, मात्र डार्ट चुकीचा गेल्याने बिबट्या सावध झाला. त्यानंतर त्याने थेट वनकर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पथकातील दोन शार्पशूटरनी तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बिबट्या ठार झाला.






