ED Raids in Mumbai: मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची मुंबईत छापेमारी
ED Raids in Mumbai: मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकले. ही कारवाई मेसर्स व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड, त्याचे प्रवर्तक हर्षवर्धन साबळे आणि संबंधित कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या तपासाचा एक भाग असल्याची माहिती समोर आली आहे.
ईडीच्या नवी दिल्ली मुख्यालयातील तपास पथकाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत ही कारवाई केली. कंपनीने आपल्या आर्थिक नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
श्वासावर विषारी हवेचा विनाशकारी प्रभाव, Baba Ramdev यांचे अचून उपाय, दिला मोलाचा सल्ला
माहितीनुसार, मेसर्स व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये आयपीओद्वारे सुमारे ४० कोटी रुपये उभारले होते. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने हा निधी लहान शहरांमध्ये एज डेटा सेंटर आणि डिजिटल लर्निंग सेंटर उभारण्यासाठी वापरला जाईल, असा दावा केला होता.
कंपनीने स्वतःला डिजिटल मीडिया, ब्लॉकचेन आणि एडटेक क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी तंत्रज्ञान कंपनी म्हणून सादर केले. मात्र, तपासात असे स्पष्ट झाले की ही सर्व आश्वासने फक्त कागदपत्रांपुरतीच मर्यादित राहिली आणि कोणतेही प्रकल्प प्रत्यक्षात राबवले गेले नाहीत.
माहितीनुसार, कंपनीने उभारलेला निधी वळवण्यात आला असून, उलाढाल आणि बाजार मूल्य वाढवून दाखवण्यासाठी खोटे व्यवहार तयार करण्यात आले. या माध्यमातून मनी लाँड्रिंगचे जाळे तयार झाले होते. शेअर बाजारातील किमती कृत्रिमरीत्या फुगवून नंतर मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. ही एक सुनियोजित ‘पंप अँड डंप’ योजना होती — ज्यात दिशाभूल करणाऱ्या प्रचाराद्वारे शेअरचे दर वाढवले जातात आणि नंतर चढ्या किमतीत विक्री करून सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक केली जाते. परिणामी अनेक लहान गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान झाले.
ईडीच्या छाप्यादरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांतून या कटाचा पर्दाफश झाली आहे. बनावट केवायसी दस्तऐवज आणि डमी सिमकार्ड वापरून उघडलेल्या शेकडो बँक खात्यांचे जाळे मुंबईतून कार्यरत असल्याचे समोर आले. झडतीदरम्यान ४०० हून अधिक चेकबुक, १०० पेक्षा जास्त ड्युअल-सिम मोबाइल फोन, तसेच २०० हून अधिक सिमकार्ड जप्त करण्यात आली. ही सिमकार्ड मुंबईतील विविध रहिवाशांच्या नावाने जारी करण्यात आली होती, असा प्राथमिक तपासात निष्कर्ष निघाला आहे.
याव्यतिरिक्त, लॅपटॉप आणि हार्ड ड्राइव्ह सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली, ज्यात पुरावे होते. हे संपूर्ण ऑपरेशन मुंबईतील छोट्या खोल्यांमधून केले जात होते, जिथे ड्रॉवर कंपन्या तयार केल्या जात होत्या. बनावट ओळखपत्रे, असंख्य बँक खाती आणि प्रॉक्सी फोन वापरून ही फसवणूक पद्धतशीरपणे करण्यात आली होती.
ईडीने इतर अनेक संशयित आणि संस्थांची ओळख पटवली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण गुंतवणूकदारांना चकित करणाऱ्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याचा इशारा देते. संपूर्ण कट उघडकीस येताच आणखी नावे समोर येऊ शकतात. ईडीचा तपास सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई निश्चित आहे.






