Maharashtra Breaking News
26 Aug 2025 10:45 AM (IST)
नाशिक मधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक प्रकार नाशिक शहरातून समोर आला आहे. पांढऱ्या थारमधील एका व्यक्तीने मुलीला गाडीत बसण्यास जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. सुदैवाने त्या मुलीने एका वृद्ध व्यक्तीच्या पाठीमागे लपून आपला जीव वाचवला. हा प्रकार काल (25 ऑगस्ट) सकाळी 8 वाजताच्या सुमारास सरडा सर्कलवर घडला आहे. पीडित मुलगी ही एका खासगी शिकवणीसाठी बाहेर गेली होती.
26 Aug 2025 10:35 AM (IST)
जागतिक बाजारपेठेतील कमकुवतपणा आणि भारतावर अमेरिकेच्या कर आकारणीपूर्वी, मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २४,९०५ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ८५ अंकांनी कमी होता. बातमी सविस्तर वाचा...
26 Aug 2025 10:25 AM (IST)
न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी न्यूझीलंडच्या संघाने टीमची घोषणा केली आहे, त्याआधी न्यूझीलंडच्या संघ अडचणीत आला आहे. त्याआधी किवी संघाला एक-दोन नव्हे तर ४ मोठे धक्के सहन करावे लागले आहेत. कर्णधारही या मालिकेतून बाहेर पडणार आहे. मिचेल सँटनर न्यूझीलंडच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. पाठदुखीमुळे त्याने द हंड्रेडमधून परतण्याचा निर्णय घेतला होता. बातमी सविस्तर वाचा...
26 Aug 2025 10:15 AM (IST)
राज्य सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील आरक्षण सोडतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने २० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या निवडणुकांमध्ये नवी चक्रीय आरक्षण पद्धत लागू होणार आहे. या पूर्वी २००२ मध्ये मतदारसंघांसाठी चक्रीय आरक्षण पद्धत लागू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये चक्रीय पद्धतीने आरक्षित सोडत काढली जात होती. आता नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा चक्रीय पद्धतीनुसार आरक्षण ठरवले जाणार आहे. बातमी सविस्तर वाचा...
26 Aug 2025 10:05 AM (IST)
दिल्ली प्रिमियर लीग 2025 चा हा सिझन शेवटचा टप्पा सुरु आहे. डीपीएल २०२५ चा ३५ वा सामना पुराणी दिल्ली ६ आणि सेंट्रल दिल्ली किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान पाऊस पडला पण निकाल लागला. पुराणी दिल्लीचे पुन्हा एकदा दुर्दैव झाले. सेंट्रल दिल्लीकडून यश धुळ आणि आयर्न राणा यांनी शानदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल, धावांचा पाठलाग करताना पुराणी दिल्लीला स्पर्धेतील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
26 Aug 2025 10:00 AM (IST)
नाशिक मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेवण्यास सांगून सातत्याने तिचा छळ करण्यात येत होता. तसेच इंस्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी तिची बदनामी करण्यात आली. या बदामी आणि सातत्याच्या त्रासाला कंटाळून एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
26 Aug 2025 09:50 AM (IST)
आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज अडचणीत सापडले आहेत. मंगळवारी (२६ ऑगस्ट) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सौरभ भारद्वाज यांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई रुग्णालय बांधकाम घोटाळ्याशी संबंधित आहे. याअंतर्गत ईडी पथकाने त्यांच्या घरी पोहोचून शोध मोहीम राबवली. ईडी पथकाने सौरभ भारद्वाज यांच्याशी संबंधित १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. सौरभ भारद्वाज यांच्यासोबतच आप सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले सत्येंद्र जैन यांच्यावरही मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
26 Aug 2025 09:50 AM (IST)
परभणी : परभणीत दोन गटांत वाद झाल्याचे समोर आले. दोन गटांमध्ये असलेला वाद आता उफाळून आला असून, दोन्ही गट आमनेसामने आले होते. यानंतर एकमेकांना लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यात आठ जण जखमी झाले असून, दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
26 Aug 2025 09:40 AM (IST)
26 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,150 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,304 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,613 रुपये आहे. 25 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,161 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,314 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,620 रुपये होता.
26 Aug 2025 09:30 AM (IST)
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे शहर पोलिसांच्या हद्दीत मोडणाऱ्या गावात अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याच अत्याचारातून पीडित मुलगी 6 महिन्यांची गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले आहे.
26 Aug 2025 09:20 AM (IST)
Bigg Boss 19 First elimination : बिग बॉस 19 ला सुरू होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत आणि आता बिग बॉसच्या घरातला पहिला स्पर्धक हा घराबाहेर झाल्याचे सांगितले जात आहे. टेलिव्हिजन वरचा वादग्रस्त शो बिग बॉस 19 ला सुरुवात झाली आहे. सलमान खानच्या या शोची जगभरामध्ये पसंती आहे. या नव्या सीजन मध्ये 16 स्पर्धक सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यातून स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
26 Aug 2025 09:10 AM (IST)
मुंबई : राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेंतर्गत लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र, यामध्ये अनेक बोगस नावं असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून ही नावं वगळण्याचे काम सुरु आहे. त्यातच आता या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी 26 लाख महिलांची सूक्ष्म छाननी सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केली.
26 Aug 2025 09:02 AM (IST)
राज्य सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील आरक्षण सोडतीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने २० ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या निवडणुकांमध्ये नवी चक्रीय आरक्षण पद्धत लागू होणार आहे. याआधी २००२ मध्ये मतदारसंघांसाठी चक्रीय आरक्षण पद्धत लागू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये चक्रीय पद्धतीने आरक्षित सोडत काढली जात होती. आता नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा चक्रीय पद्धतीनुसार आरक्षण ठरवले जाणार आहे.
26 Aug 2025 09:00 AM (IST)
मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या एका व्हिडीओवरून नवीन वाद पेटला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ शेअर करत, जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप केला होता.या ट्विटनंतर भाजप आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि मंत्री नितेश राणे यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली.या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जो स्वतःला शिवरायांचा मावळा मानतो, तो कधीही खालची भाषा वापरणार नाही. महिलेबाबत अपमानास्पद वक्तव्य करणार नाही.”
26 Aug 2025 08:58 AM (IST)
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंपन्यांना कडक इशारा दिला आहे. जिल्ह्यातील सातारा-कोल्हापूर आणि कराड-चिपळूण या दोन महामार्गांच्या कामाची गती अत्यंत संथ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये सातारा-कोल्हापूर महामार्गाचे काम २६ मार्च २०२६ पर्यंत, तर कराड-चिपळूण रस्त्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रत्येक १५ दिवसांनी बारचार्ट सादर करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी नमूद केले. दिलेल्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.
Marathi Breaking news live updates: महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची मोठी घडामोड समोर आली आहे. महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला असून संजय सावकारे यांच्या ऐवजी आता पंकज भोयर यांच्याकडे भंडाऱ्याचे पालकत्व सोपवण्यात आले आहे. दरम्यान, मंत्री संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले याबाबत अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र त्यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.