पारगाव शिंगवे : हिंदू जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने जुन्नर तालुकयातील शिवनेरी किल्ल्याची सामूहिक स्वच्छता व शिवाई देवी मंदिर परिसरात सामूहिक साफसफाई करण्यात आली. या वेळी ८०हून अधिक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जमलेल्या हिंदूत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या हिंदू राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.
हिंदू जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने समितीच्या वतीने संपूर्ण देशभरात ‘हिंदू राष्ट्र संकल्प अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदू संघटन या पंचसूत्रीनुसार समिती गेली २० वर्षे कार्यरत आहे. या वर्षी २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात नवरात्रातील घटस्थापनेला समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाली.
-नोव्हेंबरपर्यंत राबविणार ‘हिंदू राष्ट्र संकल्प अभियान’ अभियान
या द्विदशक-पूर्ती निमित्त संपूर्ण देशभरात ३१ ऑगस्टपासून समितीच्या वतीने ‘हिंदू राष्ट्र संकल्प अभियान’ राबविले जात असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे अभियान असेल. या अभियानात शिवनेरी किल्ला पहायला आलेल्या काही लोकांनी देखील आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व समिती करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. दरम्यान,या प्रसंगी शिवाई देवीच्या मंदिरात देवीच्या चरणी श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ यशस्वी होण्यासाठी देवीला प्रार्थना करून आशीर्वाद घेण्यात आली.
-यंदाच्या दिवाळीत ‘हलाल मुक्त’चा संकल्प
यामध्ये सातारा येथून आलेल्या ७५ वर्षांच्या श्री विजय देशपांडे व त्यांच्या १६ सहकाऱ्यांनी कार्याचे कौतुक केले व काही वेळा साठी सहभागी पण झाले. तसेच संभाजीनगर येथून आलेल्या काही युवकांनी शिवनेरी किल्ला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. मोई गावाच्या धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांनी यंदाची दिवाळी हि ‘हलाल मुक्त’ म्हणजेच हलाल प्रमाणित कुठलंच उत्पादन घेणार नाही किंवा खाणार नाही, असा संकल्प देखील यावेळी केला.