कराडमध्ये दुकानाला आग; २० लाखांचे नुकसान
कराड : कराडच्या शनिवार पेठेतील खाजा खिजर दर्गा परिसरात पान शॉप साहित्याच्या होलसेल दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. याबाबत जमीर आमिन खान (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शनिवार पेठेत असलेल्या खाजा खिजर दर्ग्यानजीक जमीर खान यांचे यादगार ट्रेडर्स नावाचे पान शॉप साहित्याचे होलसेल दुकान आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास जमीर खान यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. त्यानंतर घरी जाऊन जेवण करून ते झोपी गेले. मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जमीर खान यांना त्यांचा भाऊ समीर याने फोन करून दुकानातून धूर येत असल्याचे सांगितले. त्यामुळे जमीर खान हे तातडीने दुकानाकडे गेले. त्यावेळी दुकानातून धूर येत असल्याचे व दुकानात आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक पथकही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. सुमारे दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत आगीमध्ये दुकानातील सिगारेट, तंबाखू, गोळ्या, बिस्कीट, चहा पावडर, शॅम्पू, कोलगेट, चिप्स आदी साहित्य जळून सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान झाले.
चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपासून चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रेल्वे स्थानकावरील एका केकच्या दुकानात शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांची आणि रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली होती.