 
        
        फोटो सौजन्य - Social Media
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यात खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या बोरशेती येथील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान जुलाब चालू झाले आहेत.जुलाबाचे रुग्ण झपाट्याने वाढले असून हा आकडा २० च्या घरात पोहोचला आहे.यातील काही रुग्ण खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असून दोघांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात संदर्भ सेवा देण्यात आली होती.मात्र तेथेही त्यांचे जुलाब थांबले नसल्याने त्यांना पुढे नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहे.तर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही रुग्णांनी वैयक्तिक विनंतीवरून खाजगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले आहे.
दरम्यान या २० रुग्णांपैकी नितू झुगरे आणि करण शिद या दोघांना अधिक उपचारासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तेथूनही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे.तसेच काही रुग्णांनी विनंतीवरून खाजगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले आहे.तर उर्वरित ६ रुग्णांवर आवश्यक ते उपचार करून त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथून मिळाली आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता, ” बोरशेती येथे रात्री पासूनच खबरदारीची उपाययोजना सुरू केली असून रात्रीच जलशुद्धीकरण करण्याची तजवीज करण्यात आली आहे.तसेच पाणी आणि संडास नमूने घेऊन तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.व शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतरही पुढील आठवडाभर आरोग्य कर्मचारी येथे अधिक खबरदारीचा उपाय अवलंबणार आहेत.
आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोण,कशाचं आणि कसं भांडवल करेल काही सांगता येत नाही.बोरशेती मध्येही नेमकं हेच दृष्टोत्पत्तीस आले आहे.ऐनवेळी समजल्यानंतर आगंतुक पणे फोटो काढून एका स्थानिक नेत्यांने सोशल मिडियावर पोस्ट केल्यामुळे श्रेय्यवादाला तोंड फुटले होते.त्यामूळे सोशल मिडकऱ्यांची अंमळ करमणूकच झालेली पाहायला मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने संधीचं सोनं करून जो तो मीच कसा मोठा हे दाखवण्याचा दुबळा प्रयत्न करत असतो. परंतु जनताही आत्ता सुज्ञ झालेली असून ” ऐशी कळवळ्याची जाती, करीना लाभावीन प्रिती ” हा त्यांचा कावा बरोबर ओळखून आहे.






