माथेरानला आर्थिक मंदीचा फटका, शहरात पर्यटकांचा शुकशुकाट; कारण काय?
माथेरान : सध्या माथेरान हे थंड हवेचे ठिकाण मंदीच्या गर्तेत सापडले असून बाहेरचे वातावरण कडक उष्णतेमुळे तापले असताना थंड हवेचा आस्वाद घ्यायला पर्यटक फिरकत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. संपूर्ण मार्च महिन्यात माथेरानमध्ये जेमतेम ३४ हजार पर्यटक आले असून शनिवार रविवार वगळता पर्यटक येत नसल्याने येथील व्यवसायीक आर्थिक संकटात सापडले आहेत. दरम्यान, मंदीचा फटका माथेरानमधील पर्यटन स्थळी बसला असून आता परीक्षांचा हंगाम संपल्याने माथेरान मधील पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यापारी वर्गाला आहे.
ब्रिटिशांनी वसवलेल्या माथेरान या पर्यटन स्थळी असलेली प्रचंड वनराई यामुळे वातावरणात कायम थंडावा असतो. पावसाळ्यात पर्यटक हे धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी येत असतात तर हिवाळ्यात गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटक माथेरान मध्ये येत असतात. मात्र सर्वाधिक पर्यटक हे फेब्रुवारी पासून जून महिन्याचे पहिल्या आठवड्यापर्यंत येथील थंडगार हवामान यांचा आनंद घेण्यासाठी येत असतात.मात्र मार्च महिन्यात माथेरान मध्ये पर्यटन बचावाच्या नावाखाली माथेरान बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी दीड दिवसांच्या बंदचे चांगले वाईट परिणाम माथेरानचे पर्यटन व्यवसायावर पडले आहेत.माथेरान बंद आहे का अशी चौकशी माथेरान येण्याआधी केली जात असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे १८ मार्च आणि १९ मार्च रोजी केलेल्या माथेरान बंदचा थेट परिणाम येथील पर्यटनावर झाला आहे.
सध्या वातावरणात प्रचंड अशा असताना थंडगार वातावरण असलेल्या माथेरान मध्ये पर्यटक येत नसल्याने माथेरान मध्ये प्रचन्ड मंडी अनुभवली जात आहे.शनिवार रविवारी देखील तीन हजारापेक्षा अधिक पर्यटक माथेरान मध्ये आलेले नाहीत. संपूर्ण मार्च महिन्यात ३४ हजार पर्यटक माथेरान मध्ये आले असून मार्च महिन्यात पाच विकेंड आणि एक विकेंड तर सलग सुट्ट्यांचा असताना देखील पर्यटकांची संख्या जेमतेम होती. अशा दिवशी देखील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत असल्याने माथेरान साठी मार्च महिना सर्वाधिक मंदीचा ठरला आहे.त्यात लहान दुकानदार पासून मोठे हॉटेल व्यवसायीक यांना ग्राहक मिळेनासे झाले आहेत.पर्यटक येत नसल्याने कधी नव्हे असा शुकशुकाट दिसून येत असल्याने माथेरान मध्ये कोरोना काळात झालेला लॉक डाऊनची आठवण होत असल्याची माहिती माथेरान नागरी पतसंस्थेचे संचालक व्यापारी गिरीश पवार यांनी दिली.
या पर्यटन घटण्याचा फटका माथेरान पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रत्यक्ष घटकाला बसला आहे. नेरळ येथून माथेरान येणाऱ्या मिनीट्रेन मध्ये मार्च महिन्यात जेमतेम ३८१७ पर्यटकांनी माथेरान शहारत येण्यासाठी प्रवास केला.तर रस्ते मार्गाने प्रवासी टॅक्सी आणि खासगी वाहनाने माथेरान शहारत ३०७३५ पर्यटक आले.या अल्प पर्यटकांचा फटका घाट रस्त्याने पर्यटकांना घेऊन येणाऱ्या नेरळ माथेरान टॅक्सी चालक यांना झाला. त्यानंतर दस्तुरी नाका येथून माथेरान शहरात पर्यटकांना घेऊन जाणारे घोडेवाले तसेच ई रिक्षाचालक आणि हात रिक्षाचालक या सर्वांना बसला आहे. माथेरान ते अमन लॉज या दरम्यान चालणाऱ्या मिनीट्रेनचे शटल गाडीला देखील पर्यटक नसल्याने तुरळक प्रवासी यांना घेऊन फेऱ्या माराव्या लागल्या आहेत.पुढे लहान रेस्टोरंट,लॉजिंग बोर्डिंग,पॉईंट वर पर्यटकांना नेणारे घोडे यांच्यासह दुकानदार यांना मोठा फटका बसला आहे.