(फोटो सौजन्य-X)
E-Bike Taxi in Maharashtra In Marathi: महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सींना परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून परिवहन विभागाचा हा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, महाराष्ट्रात फक्त ई-बाईक टॅक्सींना परवानगी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.
एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यासाठी रिक्षा, टॅक्सी बरोबरच ई-बाईक टॅक्सीचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, संपूर्ण राज्यात केवळ ई-बाईक टॅक्सीला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या धोरणामध्ये करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. एकटा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या या ई-बाईक टॅक्सीला पावसाळ्यामध्ये प्रवाशांचे काळजी घेण्यासाठी आवरण असणे आवश्यक ठरणार असून महिला प्रवासी प्रवास करीत असताना, चालक व महिला प्रवासी यांच्यामध्ये बॅरिगेट उपलब्ध करून देण्याची जबाबदार देखील संबंधित चालकावर राहणार आहे. या व अशा अनेक महत्वपूर्ण सूचनांच्या माध्यमातून बाईक टॅक्सच्या धोरणाला अधिकाधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितले की , धर्मवीर आनंद दिघे रिक्षा-टॅक्सी महामंडळाच्या सभासदांच्या मुला-मुलींना देखील ई- बाईक टॅक्सीचा व्यवसाय करता यावा यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून त्यांना दहा हजार रुपये अनुदान देण्याची योजना देखील विचाराधीन आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना एक रुपया देखील खर्च न करता ई- बाईक साठी कर्ज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहुन नवीन व्यवसाय सुरू करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, ई-बाईक टॅक्सीच्या स्थलांतरित प्रवासी भाडे संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले. “प्रवासी भाड्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. यासंदर्भातील निर्णयाबाबत आम्ही अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आज आम्हाला धोरणाला मान्यता मिळाली आहे. कमीत कमी दरांमध्ये प्रवाशांना रोजगार कसा देता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं ते म्हणाले. प्रवासी भाड्यासंदर्भातली नियमावली सरकार तयार करणार आहे. जर स्थलांतराचे भाडे १०० रुपये असेल, तर ई-बाईक टॅक्सीमधील भाडे ३० ते ४० रुपये केले जाईल. आम्ही या संदर्भात योजना आखत आहोत. पुढील एक ते दोन महिन्यांत ई-टॅक्सी बाईक लाँच केल्या जातील”, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.