Photo Credit- Team Navrashtra
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो.गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला आणि ठाकरे सरकार कोसळले. एकनाथ शिंदेंनी आपल्या ४० आमदारांसह भाजपसोबत घरोबा करत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर गेल्या वर्षी अजित पवार यांनीदेखील आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सामील झाले. या सर्व घटनामुळे राज्यात राजकारण ढवळून निघाले होते.
आता राज्याला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाली आहे. अशातच राज्याच्या राजकारणात अजून एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर राज्यात तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा: हत्तीदेखील एकमेकांना नावाने बोलावतात; एका नवीन संशोधनातून आले समोर
या तिसऱ्या आघाडीसाठी खुद्द संभाजीराजे छत्रपतींनी पुढाकार घेतल्याचेही सांगितले जात आहे. या आघाडीसाठी मुंबईत आज महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज दुपारी वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडून आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर आणि इतर काही छोट्या पक्षांची मिळून ही तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हेदेखील तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या आधी ‘वंचित बहुजन आघाडी’ च्या माध्यमातून त्यांनी स्वत:चं स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामाध्यमातून त्यांनी दलित, बहुजन समाजासह अठरापगड जातींना वंचितच्या छताखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर 2024 च्य लोकसभा निवडणुकीपूर्वीही राज्यात तिसऱ्या आघाडीच्या चर्चा सुरू होत्या. पण यावेळीही त्यांच्या तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नाला फारसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसले नाही. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती स्वत: तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यासाठी आज काही पक्षांची बैठकही बोलवण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत आज काय होणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा: श्रावणात बनवा थंडगार केसर पियुष, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी






