आनंदाची बातमी ! म्हाडाकडून बांधली जाणार तब्बल 19497 घरे; 'अशी' असते अर्ज प्रक्रिया... (File Photo : Mhada)
अंबरनाथ/ दर्शन सोनावणे : दिवसेंदिवस शहराचा झपाट्याने विकास होत असतांना टोलेजंग इमारतींचे समूह शहराच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात निर्माण होत आहेत. मात्र या इमारतींमध्ये तयार होणाऱ्या घरांच्या किमती देखील गगनाला भिडणाऱ्या असतात. त्यामुळे मध्यम व आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबीयांना आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्ष वाट पहावी लागते. त्यामुळे अर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेली कुटुंब म्हाडाच्या माध्यमातून आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे अर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना देखील आपल्या हक्काचं घर विकत घेता यावं यासाठी म्हाडाने आपला विस्तार अंबरनाथपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली प्रमाणेच अंबरनाथ मध्ये देखील म्हाडाने स्वस्त घरे निर्माण करण्यासाठी दोन गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्यामुळे म्हाडाची कक्षा आता अंबरनाथपर्यंत वृंदावतांना दिसून येते आहे. अंबरनाथमध्ये पूर्व आणि पश्चिम भागात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून दोन गृहनिर्माण प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले असून नागरिकांची मागणी जाणून घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या सर्वेक्षणाच्या मदतीने म्हाडाला घरे उभारताना सोयीस्कर ठरणार आहे.
या दोन गृहप्रकल्पांमध्ये एकूण 2531 सदनिका बांधण्यात येणार आहेत. तसेच ही घरे खरेदी करण्यासाठी अत्यल्प आणि मध्यम उत्पन्न असे दोन गट केले आहेत. यामध्ये अत्यल्प गट ६ लाख आणि मध्यम गट 9 ते 12लाख उत्पन्न असे दोन गट करण्यात आले आहेत. उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी जनतेची मागणी जाणून घेण्यासाठी म्हाडाने ऑनलाइन गृहनिर्माण मागणी सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणामुळे या प्रकल्पांसाठी व्यवहार्यता अहवाल अंतिम करण्यापूर्वी संभाव्य अर्जदारांची अंदाजे संख्या कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन म्हाडाच्या कोकण मंडळाने केलं आहे. त्यामुळे अंबरनाथ सारख्या शहरात देखील म्हाडाची घरे नागरिकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
१) पूर्वेच्या शिवगंगा नगर परिसरात ओपन प्लॉट सर्वे नंबर ३८ (P), ७०, ७८ याठिकाणी ९२५ सदनिका होणार असून यामध्ये अत्यल्प उत्पन्न गट १५१ आणि मध्यम उत्पन्न गट ७७४ सदनिका होणार आहेत.
२) तसेच पश्चिमेला कोहोज खुंटवली येथील ओपन प्लॉट सर्व्हे नंबर ४५/१/B, ४३/५, ४२/३, ४२/४ याठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी १६०६ सदनिका होणार आहेत.
म्हाडाने सर्वेक्षण सुरू करताच नागरिकांनी उस्फुर्तपणे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन्ही गृहप्रकल्पांसाठी ३३०५ अर्ज प्राप्त झाले असू यामध्ये शिवगंगा नगर येथील घरांसाठी १६२९ आणि कोहोज खुंटवली येथील घरांसाठी १६७६ पेक्षा अधिक अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहेत. दोन्ही प्रकल्पाकरिता ५००० पेक्षा अधिक अर्ज येण्याचा अंदाज म्हाडाने व्यक्त केला आहे.
मार्च २०२५ मध्ये हे दोन्ही प्रकल्प उभारणीचे काम सुरू होण्याची शक्यता असून मार्च २०२८ पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता म्हाडाच्या कोकण मंडळाने व्यक्त केली आहे.
दोन्ही गृहप्रकल्पांमध्ये दुकाने गाळे, पार्किंग व्यवस्था, रिक्रिएशनल ग्राउंड, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टींग प्लांट, ऑर्गेनिक वेस्ट कन्व्हर्टर यूनिट, सोलार सिस्टम अशा सोयीसुविधा उपलब्ध असणार आहेत.
सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिक https://demandassessmentcitizen.mhada.gov.in/ ला भेट देऊन आणि आवश्यक तपशील देऊन सर्वेक्षणात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी, नागरिक म्हाडा कोकण मंडळाशी ०२२-६६४०५२४९ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. असे आवाहन म्हाडाच्या कोकण मंडळाने केले आहे.