एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांचा १ ऑगस्ट रोजी महापे येथे धरणे आंदोलन!
नवी मुंबई: ठाणे बेलापूर पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या संपादित जमिनींच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकार आणि एम.आय.डी.सी.च्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित धोरणांविरोधात १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता महापे, नवी मुंबई येथील एम.आय.डी.सी. प्रादेशिक कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील आणि कै. श्याम म्हात्रे यांच्या प्रेरणेने एम.आय.डी.सी. प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती, नवी मुंबई यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
१९६१-६२ मध्ये ठाणे-बेलापूर पट्ट्यातील सुपीक शेतजमिनी महाराष्ट्र सरकारने एम.आय.डी.सी.मार्फत कवडीमोल भावाने (एकर ५०००/- रुपये व वरकस एकर २५००/- रुपये) औद्योगिक कारणांसाठी संपादित केल्या होत्या. त्यावेळी शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पुनर्वसनाची आश्वासने देण्यात आली होती, परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. यामुळे येथील शेतकरी भूमिहीन झाले असून त्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदीही नष्ट झाल्या आहेत.
सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारने एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून संपादित जमिनीच्या १५% भूखंड आणि इतर सवलती देण्याचा निर्णय सरकारी अध्यादेशाद्वारे जाहीर केला आहे. चाकण-पुणे येथे या सवलती लागूही झाल्या आहेत, परंतु ठाणे-बेलापूर येथील शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे. या संदर्भात शेतकरी कृती समितीने महाराष्ट्र सरकार आणि एम.आय.डी.सी. अधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार आणि चर्चा केली आहे, परंतु त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या पूर्वीही शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संघर्ष केला आहे. ८ मार्च २०११ रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, २७ जुलै २०११ रोजी विधानसभेवर मोर्चा आणि आझाद मैदानात आंदोलन, तसेच १ ऑगस्ट २०१२ रोजी एम.आय.डी.सी.च्या अंधेरी येथील मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या सर्व आंदोलनांना यश आले, चर्चा झाल्या, परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.