सौजन्य - नवराष्ट्र टीम
माण-खटाव मतदारसंघातील एकूण ९ जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल ५ गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे आणि भावजय भारती अंकुश गोरे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे हा निकाल केवळ निवडणूक पराभव न राहता, गोरे कुटुंबाच्या राजकीय प्रभावाला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे.
प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक प्रश्न, शेतकरी, पाणीटंचाई, विकासकामांचा अभाव आणि ग्रामपातळीवरील नाराजी या मुद्द्यांवर प्रभावी प्रचार केला. त्याचा थेट परिणाम मतपेटीत दिसून आला. मतदारांनी सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कौल दिला आहे.
या विजयावर प्रतिक्रिया देताना प्रभाकर देशमुख यांनी हा निकाल “सामान्य जनतेच्या प्रश्नांचा विजय” असल्याचे म्हटले. “माण-खटावमधील शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. पाणी, रोजगार, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या बाबींची दखल न घेतल्याचा हा परिणाम आहे,” असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “हा विजय अजित दादांना समर्पित असून, तो कुणा एका व्यक्तीचा नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाचा आहे.”
दरम्यान, या पराभवामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली असून, स्थानिक पातळीवरील नाराजी आता स्पष्टपणे समोर येत आहे. माण-खटावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले हे यश सत्ताधाऱ्यांसाठी इशारा मानले जात असून, जनतेचा संयम संपत चालल्याचे संकेत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत. या निकालामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोबल उंचावले असून, प्रभाकर देशमुख यांचे नेतृत्व पुन्हा एकदा प्रभावी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हे सुद्धा वाचा : सत्ता मिळताच दादागिरी! भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?






