मंत्री शंभूराज देसाई यांचा माण दौरा करत पूरग्रस्त शेतीची पाहणी केली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Shambhuraj Desai Man Visit : दहिवडी : महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माण तालुक्यात नुकतीच अतिवृष्टी झाली. जोरदार झालेल्या पावसामुळे शेतामधील पिकाचे तसेच अनेक व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नवरात्रचे उपवास असताना पायात चप्पल न घालता अनवाणी स्वरूपात ते शेतकऱ्यांच्या बांध्यावर गेले. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तीन दिवसांपूर्वी 26 व 27 सप्टेंबर रोजी माण तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय लव्याजम्यांसह नुकसानग्रस्त शेतीच्या ठिकाणी जाऊन तसेच व्यवसायिक, व्यापारी यांच्या आपत्तीग्रस्त ठिकाणी जाऊन पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले. पिंगळी गावच्या हद्दीतील अतिवृष्टीमुळे पूर्णपणे वाया गेलेला कोबी भाजीपाल्याचा प्लॉट , आदर्श गाव लोधवडे येथील माजी सरपंच शामराव पवार तसेच प्रताप पवार यांचा केळीचा कुजण्याच्या अवस्थेत असणारा प्लॉट , तसेच पिंपरी येथील राजगे यांच्या सढण्याच्या अवस्थेत असणाऱ्या कांद्याच्या प्लॉटला पालकमंत्री यांनी भेट देऊन प्राप्त परिस्थितीची पाहणी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
म्हसवड शहरातील पुराच्या पाण्यामुळे झालेले व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान याबाबत नामदार देसाई यांनी नियम शिथिल करून पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. म्हसवड येथील सातारा पंढरपूर महामार्गावरील दुतर्फा गटार बांधकामाबद्दल स्थानिकांनी रोष व्यक्त करताच राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ पुणे कार्यालयातील अधिकाऱ्याला फोन लावून ‘ऑन द स्पॉट’ त्यांची कान उघडणे केली.
सर्व पहाणी दौऱ्यापूर्वी आणि तालुक्यात मंत्री महोदयांचे आगमन होण्यापूर्वी प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी एकच चर्चा करत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नवरात्रीचे सलग उपवास, त्यामुळे शारीरिक अशक्तपणा, याबरोबरच मंत्र्यांच्या पायात चप्पल नाही, त्यांना अनवाणी किती दूरपर्यंत चालवायचे याबाबत प्रशासकीय अधिकारी भीतीयुक्त संभ्रमात होते . मुख्य रस्त्यापासून काट्याकुट्यातून, गवत व झुडपातून त्यांना चालत शेताच्या बांध व नुकसानग्रस्त पिकापर्यंत न्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हाडाचा शेतकरी व तळागाळातील जनतेशी घट्ट नाळ असणारे शंभूराज देसाई यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्याचा अंदाज फोल ठरविला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्य रस्त्यावरून लाल दिव्याच्या गाडीतून खाली उतरताच पिंगळी, लोधवडे, पिंपरी येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत शंभूराज देसाई नेहमीच्याच उत्साहात बाधित शेतीत गेले. तसेच संबंधित शेतकऱ्याची आपुलकीने विचारपूस करून शासन तुमच्या पाठीशी आहे ,घाबरू नका, नुकसानीचे पंचनामे करून घ्या. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न राहील असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. म्हसवड येथील मुख्य ठिकाण शिंगणापूर चौक ते बस स्थानक हे अंतर अक्षरशः पायाला खडे टोचत असताना पायी पार केले.
म्हसवड येथील माण गंगा नदीवरील पुलाचे उद्घाटन तात्कालीन मंत्री शंभुराज देसाई यांचे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी केल्याचे उपस्थित मधील वयोवृद्ध लोकांनी सांगितले व जुन्या आठवणींना उजाळा करून दिला.आजोबाच्या पावलावर पाऊल ठेवून मंत्री शंभूराज यांनी माण तालुक्याचा नुकसानग्रस्त पीक पाहणी दौरा केल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यात शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, शिवसेना तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुलानी, म्हसवड शहराध्यक्ष वैभव गुरव, पंत मंडले, हनुमंत राजगे, अनिल मासाळ,सुभाष काळुंगे,अंकुश नलवडे आदी शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते.