खासदार संजय राऊत यांनी राज अन् उद्धव ठाकरेंच्या युतीवर आणि दसरा मेळाव्यावर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
Thackeray brothers alliance : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लवकरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. शिवतीर्थावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “चर्चा आहे, चांगली चर्चा आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं. आमचा संघाचा दसरा मेळावा नाही. एक परंपरा आहे दसरा मेळावा. शिवसेनेची परंपरा कधीही खंडित होत नाही. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा त्यांनी सुरत किंवा अहमदाबादला घ्यावा. जय शहा यांना त्यांनी बोलवावं. शिंदे गटाने गुजरातमध्ये जाऊन त्यांनी मेळावा घेतला पाहिजे. भगवी शाल घेऊन बाळासाहेबांसारखी दाखवता पण तुम्ही कोण आहात. मीच बाळासाहेब एवढा दाखवायचं बाकी आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पूरस्थितीवरुन देखील खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावर राऊत म्हणाले की, “कॅबिनेट आहे तर एक कॅबिनेट तात्काळ लवाजमा न घेता जिथे पूरपरिस्थिती आहे तिथे घ्यायला हरकत नव्हती. कॅबिनेटला काय परिस्थिती आहे हे त्यांना समजलं असतं. मुख्यमंत्री दिल्लीला गेले पंतप्रधांनी सांगितलं अहवाल पाठवा. गेला का नाही माहीत नाही. मुख्यमंत्री एक दोन दिवस त्या भागात होते. मदतीचे निकष आजच्या कॅबिनेटमध्ये बदलणं गरजेच आहे ओला आहे की सुखा हे आम्हाला माहित नाही. पण शेतकऱ्यांना 5 -10 हजाराची मदत ही थट्टा आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत हवी आहे. हेक्टरी 50 हजार हवी आहे. ही देण्याची मानसिकता मला मुख्यमंत्र्यांची दिसत नाही,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली बँकांकडून थांबवली पाहिजे. ज्या मंत्र्यांनी सहकारी बँकेचे घोटाळे केले आहेत. ते वसूल करावं. हिंदू -मुस्लिम विषय हा पुरामुळे जो बोजवारा उडाला त्यामुळे भाजपच्या उप कंपन्या हे करत आहे. पूर परिस्थिती वरच लक्ष विचलित करण्यासाठी हे सुरु आहे. अहिल्यानगर मधला खड्ड्यांचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला. हे सगळं विचलित करण्यासाठी दंगली घडवायच्या. हे टिळा लावून फिरत आहेत ते बडगे हिंदुत्व आहे. ज्यांनी या दंगली घडवल्या त्यांनी हिंदुस्तान पाकिस्तान मॅचला विरोध केला नाही. हे ढोंगी हिंदुत्ववादी आहेत. भाजपाने काय कारवाई केली? देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्री काय केलं. सोनम वांगचुक यांना अटक करतात. आणि राहुल गांधी यांना गोळी घालण्याची धमकी देतो. काय केलं. दंगली घडवा अशी भाजपची इच्छा दिसते. यावर गृहमंत्र्यांनी भाष्य करायला नको का,” असे अनेक राजकीय प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत.