साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनावर मंत्री शिवेंद्रराजेंचं मोठं विधान;
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी मनोमिलनाच्या प्रश्नाचा चेंडू सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कोर्टात टोलवला होता. शिवेंद्रसिंहराजे यांनी मनोमिलनाच्या मुद्द्यावर पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले आहे. नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सातारा जिल्ह्याच्या संदर्भात जो निर्णय घेतील, त्या निर्णयानुसार पुढील हालचाली होतील, अशी स्पष्टोक्ती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
राजवाडा परिसरात बहुमजली पार्किंगच्या विकसन प्रक्रियेसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. खासदार उदयनराजे भोसले व मी स्वतः भाजपमध्ये एकाच पक्षात असून त्याचे आम्ही जबाबदार पदाधिकारी आहोत. सातारा जिल्ह्याच्या संदर्भाने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या संदर्भाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल आणि त्यानुसारच पुढील निर्णय होतील.
जुन्या जनावरांच्या दवाखान्याची जागा नगरपालिकेला हस्तांतरित झाली आहे काय या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, याबाबत यापूर्वी नगरपालिकेच्या माध्यमातून पाठपुरावा झाला होता. बहुमजली पार्किंगच्या कामासंदर्भात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याशी आमची चर्चा झाली असून, त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, हे काम कोणाकडूनही घडो ते होणे महत्त्वाचे आहे, असे सूचक विधान त्यांनी केले.
सातारा शहरात नगरपालिकेच्या जागांमध्ये मटक्याचे अड्डे सुरू आहेत. या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा पोलिसांना याबाबत योग्य ते निर्देश देऊन कठोर कारवाई करण्यासंदर्भात मी बोलणार आहे. तसेच सातारा शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवसाचे फ्लेक्स लागत असतात, फ्लेक्स हा माझा असो किंवा खासदार उदयनराजे भोसले यांचा असो आम्ही दोघेही अशा प्रदर्शनाच्या विरोधात आहोत. नगरपालिकेला याबाबत यापुढे असे बोर्ड लावता कामा नये अशा लेखी सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
छावा संघटना आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लातूर येथे जोरदार भांडण झाली. त्यामध्ये छावा संघटनेच्या प्रदेशांध्यक्षांना मारहाण झाली, या प्रशासंदर्भात बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, प्रत्येकाला निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे. काही वेळा कार्यकर्त्यांच्या भावना या अनावर होतात आणि त्यातूनच असे प्रकार घडतात. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना जरूर नियंत्रणात ठेवाव्यात घडलेल्या प्रकारात अत्यंत निंदनीय आहे. या घटनांचे विचित्र पडसाद उमटू नये म्हणून लातूर जिल्हा प्रशासन व पोलिसांना त्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत असे ते म्हणाले.