अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या दोन तरुणांना महाड एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. योगेश बाजीराव शिरवले (वय २२ , रा. आकले ता.महाड ) आणि सुरज अनंत कळंबे (वय२३, रा . वडघर ता. महाड) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. पिडीत मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असताना देखील या दोघांनी मे २०२३ ते सप्टेंबर २०२३ या काळात तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर शारिरिक अत्याचार केले. त्यातून पिडीता गर्भवती राहिली.
२८ ते ३० आठवड्यांच्या गर्भावस्थेत तिला महाड शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार योगेश शिरवळे आणि सूरज कळंबे या दोघां विरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ , ३७६ (२) (एफ), (के), (एन ) आणि पोस्को अधिनियम २०१२ चे कलम ४,६ ,८ ,१० , १२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर हे करीत आहेत.