कुणाल कामराच्या टीकेवर शिवसेना आक्रमक ; स्टँडअप कॉमेडियन विरोधात तक्रार दाखल
भाईंदर/ विजय काते : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर सार्वजनिक मंचावर विडंबनात्मक गाण्याच्या माध्यमातून विनोद केले होते. दरम्यान या सगळ्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. कुणाल कामराने अशोभनीय टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी राज्यभरातून कामराच्या विरोधात गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली असून, मीरा-भाईंदर शहरातही शिवसेनेच्या वतीने पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी 146 विधानसभा अध्यक्ष सचिन मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयात जाऊन पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी कामरावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली व यासंदर्भात अधिकृत निवेदन सादर केले.या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर, महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर, 146 विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर, 145 विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंग, 146 विधानसभा महिला प्रमुख पूजा आमगावकर, तसेच शिवसेनेच्या लीगल सेलचे अध्यक्ष राजदेव पाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेने ठाम भूमिका घेत “व्यंग, विनोद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादेत असावे, मात्र कुणाच्याही प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी, व्यक्तिगत स्वरूपाची टीका करणारी भाषा योग्य नाही”, असे मत मांडले आहे.
“महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका राज्याच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारी आहे. समाजात गैरसमज पसरवून लोकांच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे,” असे शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कामराच्या मागे ‘संजय राऊत’ असल्याचा आरोप
शिवसेनेने असा दावा केला आहे की या प्रकारामागे खासदार संजय राऊत यांची भूमिका असू शकते. त्यांचा हा ‘सुपारी प्रकरण’ असल्याचा आरोप करत “पोलीस यंत्रणेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी,” अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
1. कुणाल कामरावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.
2. विडंबनात्मक गाण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्नांना आळा घालावा.
3. या प्रकारामागे कोणाचा हात आहे, याची सखोल चौकशी करण्यात यावी.
कुणाल कामराच्या या टीकेनंतर महाराष्ट्रातील विविध भागांत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या जात आहेत, तर काही ठिकाणी कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला जात आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे आता पोलीस यंत्रणा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.