सौजन्य : सोशल मीडिया
पुणे : महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मध्यंतरीच्या काळात अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाले. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रिपद तर त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रिपदे देण्यात आली.
पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, अधिवेशनाचे सूप वाजले तरीही विस्तार झालेला नाही. अशातच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारला पुन्हा डिवचले. ते म्हणाले, विस्तार झाल्यास नाराज आमदारांमधील कलगितुरा आणखी वाढेल, अशी भीती सरकारला आहे. त्यामुळेच तो टाळला जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तार करून आता फायदा नाही. 2024 च्या निवडणुकीनंतरच विस्तार करणे योग्य ठरेल. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर त्यात दोन-तीन महिने जातील आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभेची आचारसंहिता लागेल. त्यामुळे सरकारने आता मंत्रिमंडळ विस्तारात डोकं घालू नये, असेही त्यांनी सांगितले.