कणकवली : आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उबाठा आणि संजय राऊत हे कशासाठी जल्लोष करत आहेत? भाजपाच्या निवडून आलेल्या खासदारांचा आकडा आहे, तेवढा इंडिया आघाडीतील पक्षांचा आकडा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी दीड लाखाच्या फरकाने निवडून आले आहेत. परंतु आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात काय झाले? हे पहा. फक्त 5 हजार मतांचे लीड अरविंद सावंत यांना मिळाले आहे. मंत्री आणि आमदार असताना ही परिस्थिती कशी काय आली? उद्धव ठाकरे हे मोदी यांच्यासोबत असताना त्यांचे 18 खासदार होते, आता 21 जागा लढवून 9 खासदार निवडून आले. काँग्रेसने मदत केल्याने ते निवडून आले आहेत. मग उबाठा कशाची दिवाळी साजरी करत आहेत? देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार येत आहे. ठाकरेंच्या जागा घटल्या तरीही दिवाळी कशासाठी? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
[read_also content=”“पराभवाची जबाबदारी स्वीकारत; सरकारमधून मी बाहेर पडण्यासाठी पक्षश्रेष्ठींना करणार विनंती”; देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य https://www.navarashtra.com/maharashtra/fadnavis-big-statement-accepting-responsibility-for-defeat-lok-sabha-2024-in-maharashtra-will-request-party-leaders-to-quit-government-nryb-543148.html”]
पुढे ते म्हणाले की, शिवसेना एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांचे नुकसान झाले आहे. भाजपाचे मोदी यांच्या नेतृत्वाखाली 250 खासदार निवडून आले आहेत. मग सरकार बनविण्याची भाषा संजय राऊत कुठल्या आकडेवारीवर करत आहे. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या सल्ल्यावर जगत आहेत. पूर्ण कोकणात उबाठा साफ झाली आहे. पालघरमध्ये भाजपाचा खासदार झाला, ठाण्यात शिवसेना आणि रायगड राष्ट्रवादी तर रत्नागिरीत भाजपाचे नारायण राणे निवडून आले आहेत, मग उबाठा कोठे आहे?
देशातील अल्पसंख्यांक समाजाने मतदान कोणाला केले? याचे विश्लेषण निश्चितच केले जाईल. मात्र, आमच्या जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाज आमच्या सोबत ताकदीने उभा राहिला आहे. राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा फरक पडला काय? याबाबत येणाऱ्या दिवसात निरिक्षण करण्यात येईल. मुंबईत अनिल देसाई हे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघातून मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे विश्लेषण करायचे असेल तर संजय राऊत यांनी यावे आणि आमच्या बाजूला बसावे म्हणजे आम्ही त्यांना सत्य दाखवून देऊ. कोकणातील जनतेने विकासाला विरोध केल्यानेच उबाठाला नाकारले आहे.
400 पारच्या मुद्द्यावर आम्ही पूर्ण निवडणूक लढलो, मात्र मॅजिक आकडा 272 चा आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे यश मिळाले. रत्नागिरीत जे मतदान कमी झाले आहे. त्याबाबत महायुतीतील लोकांशी बोलून निश्चितपणे विचार करु. राजापूर विधानसभा मतदारसंघात फक्त 20 हजारांनी आम्ही मागे राहिलो. त्याबाबत आगामी विधानसभा निवडणुकीत कशी रणनीती आखायची ते पाहू, आमची मुले, तरुण-तरुणी यांना गोवा राज्याकडे जायची गरज भासणार नाही. त्यांच्या गावांमध्ये राहून हक्काच्या नोकऱ्या आमच्या मुलांना भेटणार आहेत. आता उध्दव ठाकरे नावाची रोजगाराच्या वाटेतील काळी मांजर कायम स्वरूपी जनतेने हद्दपार केली आहे. किरण सामंत यांच्या नॉट रीचेबलमुळे कुठेही फरक पडलेला दिसत नाही.त्यांनी काम केले आहे.ते माझ्या संपर्कात होते,त्यांनी उलट मदतच केली आहे.कुडाळचे विश्लेषण निलेश राणे करतील. 27 हजारांचे लीड आम्हाला आहे,नैतिक दृष्ट्या वैभव नाईक यांची हार झाली आहे. रत्नागिरीत जे मतदान कमी पडले त्याबाबत उदय सामंत हे विश्लेषण करतील. ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प राजापुरात होणार आहे. त्याची तयारी आता सुरु होईल असेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.