सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुन्हा एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांची साथ सोडली. तसेच इंदापुरमधील प्रवीण माने यांनीही अजित पवारांची साथ सोडली. आता माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेही अजित पवारांना धक्का देण्याची शक्यता आहे. आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. पुण्यातील मोदी बाग इथं बबनदादा शिंदे आणि रणजितसिंह शिंदे पोहोचले आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार हे सध्या पुण्यातील मोदी बागेमध्ये आहेत. या ठिकाणी अनेकजण शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. अशातच माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजिससिंह शिंदे शरद पवार यांना भेटण्यासाठी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमुळं अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. कारण आमदार बबनराव शिंदे शरद पवार गटात घरवापसी करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे माढा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू धनराज शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती. तर आमदार बबदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी रोहित पवार यांचे वडिल राजेद्र पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून कोणाला तिकीट मिळणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.