सौजन्य - नवराष्ट्र टीम
सातारा : राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढ चालल्या आहेत. विकृत लोक हे चिमूरड्या मुलींनाही सोडत नाहीत. राज्यात महिला मानसिक सक्षम राहिल्या नाहीत. त्यांचे जगणे मुश्किल झाले असताना गृहखाते झोप काढत आहे. या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा टोला खासदार प्रणिती शिंदे यांनी महायुती सरकारला लगावला.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अल्पना यादव, नरेश देसाई, रणजित देशमुख उपस्थित होते.
खासदार शिंदे म्हणाल्या, साताऱ्यात काँग्रेसचा एकच आमदार असून पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्यात आमदार संख्या वाढावी. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. लोकसभेत जे चित्र दिसून आले त्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र चांगले वातावरण आहे. कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची ऊर्जा आहे. राज्यात शेतकरी, महिला या महायुती सरकारला वैतागल्या आहे. बदलापूर, पुणे यासह अन्यठिकाणी लहान मुलींवर, महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. विकृत लोक चिमुरडयांनाही सोडत नाहीत. अशा विकृत मानसिकतेचा वध केला पाहिजे. सरकार हे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणून मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात सुमारे ६४ हजार मुली बेपत्ता आहेत त्यावर गृहविभाग काहीच करताना दिसत नाही. निवडणूक लागली की, महायुती सरकारला लाडकी बहिण आठवली असल्याचा आरोप त्यांनी केला.
जागा वाटपाचा निर्णय अद्याप नाही
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यातील जागा वाटप निर्णय अद्याप झाला नसून तो वरिष्ठ पातळीवर आहे. अशोक चव्हाण गेले आहेत. त्याठिकाणी सुखी रहावे. विरोधकांवर टीका करू नये. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असून याबाबत मी मुख्यमंत्री असताना प्रस्ताव तयार होता. गेली दहा वर्षे सरकार हा निर्णय घेतला नसून आगामी निवडणूकीच्या तोंडावर अभिजात दर्जा दिला आहे.