सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकिय व्यक्तीची नियुक्ती नको. गेल्या काही प्रकरणात आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भुमिका योग्य दिसून आली नाही. पक्षाचा एक विभाग असल्यासारखे आयोगाचे काम कोणी चालवित असेल, तर ते योग्य ठरणार नाही, असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच चाकणकर यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहीजे असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेच्या वतीने ‘एमपीएल’ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परीषदेत आमदार पवार यांनी राजकीय विषयांवरही भाष्य केले. वैष्णवी कस्पटे – हगवणेच्या आत्महत्येनंतर राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यावर टिका केली गेली. या संदर्भात बोलताना आमदार पवार यांनी राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तींची नियुक्ती करता कामा नये. या पदावर निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलिस अधिकारी आदी क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती झाली पाहीजे. यासंदर्भात आम्ही विधानसभेच्या पुढील अधिवेशनात विषय उपस्थित करणार आहोत. महीला आयोगाप्रमाणेच इतर आयोगावर अराजकीय व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजकीय व्यक्तीची आयोगावर नियुक्ती झाली, तर तेथे राजकारण होणारच, असे नमूद करीत आमदार पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षांत या आयोगाच्या अध्यक्षपदावर काम करणाऱ्या व्यक्ती या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. यामुळे महीला आयोग हा आपल्या पक्षाचा विस्तारित विभाग असल्यासारखे कामकाज केले जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आणखी काय म्हणाले आमदार पवार ?
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून केलेल्या वक्तव्यांवर आमदार पवार यांनी नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणुसकीशून्य असलेलल्या कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि काय बोलावे याचा क्लास त्यांना लावावा, असा मार्मिक सल्ला दिला.
दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्यासंदर्भात आमदार पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे बोट दाखविले. ‘‘मी आणि जयंत पाटील यांनी दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात पत्र दिल्याची माहीती खोटी आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विषयी निर्णय घेण्याचे अधिकार हे पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहेत, असे त्यांनी नमूद केले.