मुंबई : औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने मंगळवारी तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांना दिली. काही दिवसांपासून ते छातीत दुखण्याची तक्रार करत होते. त्यामुळे औरंगाबाद येथील रुग्णालयात त्यांची तपासणी केली. यातून त्यांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे आता मुंबईत हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान आमदार शिरसाट यांना मंगळवारी सकाळी एअर अॅम्बुलन्सने दाखल केले. सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिरसाट उपस्थित राहिल्यानंतर छातीत दुखण्याच्या तक्रारीने ते बैठकीतून निघाले. त्यांनी छातीत दुखण्याची तक्रार केल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील तपासणीतून संजय शिरसाट यांना यापूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले.
तसेच रक्तदाब वाढल्याची बाब प्रामुख्याने दिसून आली. म्हणून डॉक्टरांनी शिरसाट यांची अँजिओग्राफी केली. अँजिओग्राफी झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी मुंबईत उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना मंगळवारी सकाळी एअर अॅम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले. सध्या प्रकृती स्थिर असून निव्वळ देखरेखीसाठी मुंबईला हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी देखील काळजीचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.