सौजन्य - नवराष्ट्र टीम
औद्योगिक सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेवर विशेष भर
शहरातील औद्योगिक परिसरात होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांचे सर्वंकष सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी आमदार जगताप लक्षवेधी सूचनेद्वारे करणार आहेत. तसेच अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारण्याचाही मुद्दा ते मांडणार आहेत. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक, सुरक्षाविषयक अडचणी आणि आयटीयन्सच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही ते करणार आहेत.
महानगरातील महत्त्वाचे प्रकल्प आणि प्रशासकीय प्रश्नांवर भर
पवना नदी सुधार प्रकल्प, पिंपरीचा आरोपीबंध मंजुरी, अवजड वाहनांमुळे होणारे अपघात, फास्ट ट्रॅक लेबर कोर्ट, लिफ्ट सुरक्षा आणि शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची तातडीची गरज यावर जगताप अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहेत. तसेच पीएमआरडीकडील भूखंडांच्या लिलावाला स्थगिती देणे, काळेवाडी–हिंजवडी–बिजलीनगर महावितरण शाखांचे विभाजन, वंचित विद्यार्थ्यांची १२६ कोटींची थकीत महाज्योती छात्रवृत्ती तातडीने मंजूर करणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा चुकीचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची मागणी हे महत्त्वाचे मुद्दे असतील.
आरोग्य, शिक्षण आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रश्न
रुबी हॉलच्या किडनी रोपण घोटाळ्याची चौकशी, औंध जिल्हा रुग्णालयातील बंद एमआरआय सुविधा, कुपोषित बालकांसाठी पोषक आहार पुरवठ्याची चौकशी, सांगवी जिल्हा रुग्णालयात फॉरेन्सिक डॉक्टरची नियुक्ती, राज्यातील १२ हजारांहून अधिक रिक्त प्राध्यापक पदांच्या भरतीची मागणी हे मुद्देही ते उपस्थित करणार आहेत. पिंपरीतील न्यायालयीन सोयीसुविधांचा अभाव दूर करण्यासाठी वाकड–हिंजवडी परिसरातील खटले पिंपरी न्यायालयात वर्ग करणे, तसेच महापालिका रुग्णालयांत कॅशलेस सुविधा उपलब्ध करण्याची मागणीही अधिवेशनात मांडली जाईल.
नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबतही मागण्या
टीओडी वीजमीटरशी संबंधित तक्रारी, शिधापत्रिका केवायसी प्रलंबितामुळे नागरिकांना होणारी गैरसोय, गृहनिर्माण सोसायट्यांमधील लिफ्ट सुरक्षा, प्राधिकरणातील नागरिकांना सातबारा व प्रॉपर्टी कार्ड वितरण या विषयांवरही जगताप यावेळी ठोस भूमिका मांडणार आहेत. अल्प कालावधीचे अधिवेशन असले तरी शहराचे दीर्घकालीन आणि तातडीचे प्रश्न उपस्थित करून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.






