फोटो सौजन्य - Social Media
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने आज एक ऐतिहासिक निर्णय घेत, मुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्या आमूलाग्र सुधारणा करण्याच्या दिशेने ₹12,000 कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या १९ महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली. ही मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, आणि आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या पुढाकाराने घेण्यात आली.
या निर्णयानुसार मेट्रो मार्ग २A, २B, ४, ४A, ५, ६, ७, ७A आणि ९ यांसाठी विविध घटकांसाठी रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, सिव्हिल वर्क्स, पॉवर ट्रॅक्शन, AFC प्रणाली, डेपो सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन एकूण १९ कंत्राटांना मान्यता देण्यात आली आहे. प्रमुख प्रकल्पांमध्ये मेट्रो लाईन ४ व ४A साठी ₹४,७८८ कोटींचे एल अँड टीला एकात्मिक प्रणालीसाठी दिलेले कंत्राट, मेट्रो लाईन ६ साठी ₹२,२६९ कोटींचा रोलिंग स्टॉक व पॉवर सिस्टमचा करार, तसेच ₹५३५ कोटींच्या मल्टी-मोडल इंटिग्रेशन प्रकल्पांचा समावेश आहे. या शिवाय अटल सेतू (MTHL) प्रकल्पासाठी ₹५५१ कोटींच्या ITS व ATMS प्रणालीसाठीचा खर्चही मंजूर करण्यात आला.
मेट्रो स्थानकांवर फूट ओव्हरब्रिज बांधण्यासाठी ₹२०६ कोटींची दोन पॅकेजेसमध्ये कंत्राटे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच पायाभूत सुविधा डिजिटल निरीक्षण प्रणालीसाठी ₹११५ कोटींचे कंत्राट Censys Technologies ला देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र शासन केवळ आजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नव्हे तर भविष्यातील मागण्यांची पूर्वकल्पना घेतलेली पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. एमएमआरडीएकडून मंजूर झालेली ही ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक किमतीची गुंतवणूक मुंबईच्या एकात्मिक आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक गती, शहरी गतिशीलता आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की,“एमएमआरडीएकडून झालेली ही ऐतिहासिक मंजूरी महाराष्ट्र सरकारच्या जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधेच्या बांधणीसाठीच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीद्वारे आम्ही एक समतोल, शाश्वत आणि आधुनिक मेट्रो नेटवर्क घडवत आहोत.” आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यावर भर दिला की, “आज मंजूर झालेले प्रत्येक प्रकल्प हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकात्मिक विकासात मोलाचा वाटा उचलेल याची खात्री करून घेतली आहे. सिस्टम्स इंटिग्रेशन, रोलिंग स्टॉक, ट्रॅक्शन पॉवर, AFC व मल्टी-मोडल इंटिग्रेशन या सर्व घटकांना जोडणारी ही कंत्राटे आम्ही ऑपरेशनल रेडिनेस लक्षात घेऊन मंजूर केली आहेत. शेवटच्या टप्प्याच्या जोडणीवर आमचा भर असून, प्रवाशांसाठी सहज, गतीशील आणि एकात्मिक वाहतूक संरचना निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.”