रेल्वे अपघातावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया (फोटो - टीम नवराष्ट्र))
मुंबई: दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून गाडीतून 8 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती समोर आली आहे. फास्ट लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची माहिती असून यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता या प्रकरणावर माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवर बोलताना माणसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “रेल्वेची घडलेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र मुंबईच्या रेल्वेमध्ये असे अपघात सातत्याने घडत आहेत. हा विषय केवळ रेल्वेपुरता मर्यादित नाही. आपल्या शहरांचा विचका झाला आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची आपल्याकडे गोष्टच नाहीये. रेल्वे, ट्राफिकचा बोजवारा उडालेला आहे. कोण येतंय, कोण जातंय हे कळात नाहीये. रस्ते नसल्याने पार्किंग नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “बाहेरून येणाऱ्या लोंढयांमुळे रेल्वे सेवा कोलमडली. केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. सगळे निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. मोनो, मेट्रोमुळे हे प्रश्न सुटणार नाहीत. राज आणि उद्धव एकत्र येण्यापेक्षा या समस्या हट्ट्याच्या बातम्या दाखवा. मुंब्रा येथील धोकादायक वळण सर्वाना माहिती, ते काही नवीन नाहीये. मुंबईत संध्याकाळी घुसून दाखवा.”
दिवा- मुंब्रा लोकल दुर्घटनेत पोलिस कर्मचाऱ्याचाही मृत्यू
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ठाणे रेल्वे पोलिस दलातील कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्याद हेही मृत्यूमुखी पडले आहेत. धावत्या लोकलमधून १० ते १२ जण खाली पडल्याने सकाळी हा दुर्दैवी अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि अनेक प्रवासी दारांवर लटकून प्रवास करत होते.
या अपघातानंतर लवकरच रेल्वे बोर्डाने ही बाब गांभीर्याने घेतली आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या सूचनांनुसार, आतापासून मुंबई उपनगरीय क्षेत्रातील बांधकामाधीन सर्व रेल्वे स्थानकांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची सुविधा अनिवार्य केली जाईल. त्याचा उद्देश चालत्या ट्रेनमध्ये दरवाजे उघडे राहू नयेत आणि कोणताही प्रवासी लटकून प्रवास करू नये असा आहे. यासोबतच, सध्या सेवेत असलेल्या सर्व डब्यांचेही पुनर्रचना केली जाईल. सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी या गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची प्रणाली देखील बसवली जाईल.