मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील फोडण्यात आली होती. एकनाथ शिंदेंनी त्यावेळी बंड पुकारलं आणि त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. दरम्यान महाराष्ट्रातील या राजकीय भुकंपानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकत्र यावं, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्रातील राजकीय भुकंपानंतर मनसेकडून शिवसेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. ‘आता तरी एकत्र या,’ अशी मागणी या बॅनरवर करण्यात आली आहे.
मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, अशी साद घालणारे बॅनर यांनी लावले आहेत. बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्या राज-उद्धव यांच्यासोबत फोटो लावण्यात आला आहे.
बॅनरवर लिहिलंय काय?
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. राजसाहेब – उद्धवसाहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. सोशल मिडीयावरसुद्धा राज-उद्धव एकत्र यावं, असं अनेक जण लिहित आहेत. मात्र शिवसेना भवन परिसरातील या बॅनरची आता जोरदार चर्चा होत आहे.
शरद पवारांची पुन्हा उभारी
दरम्यान राष्ट्रवादी पक्ष व निवडणूक चिन्हावर अजित पवार गटाने दावा केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगम या स्मृतीस्थळावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपण पुन्हा उभारी घेऊ, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
भाजपला जागा दाखवणार – पवार
शरद पवार म्हणाले की, काल जो प्रकार घडला आहे, तो अतिशय चुकीचा आहे. ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यासोबत तुम्ही विश्वासघात केला आहे. पक्षासोबत गद्दारी केली आहे. त्यामुळं योग्य वेळी पक्ष गेलेल्या आमदारांवर कारवाई करेल. नऊ आमदार अपात्र होण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली असल्याचं पवार म्हणाले. उलथापालथ करणाऱ्या शक्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा शरद पवारांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला आहे.