Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब
Pune Election 2026 NCP : ठरलं तर! पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार;
काँग्रेस नेते सतेज पाटील आणि ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी पुणे महापालिका निवडणूक सोबत लढवणार असल्याचे जाहीर केलं. यावेळी जागावाटपाची देखील घोषणा करण्यात आली. पुणे महापालिकेत काँग्रेस ६० जागांवर लढणार असून ठाकरेसेना ४५ जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. पण हा आकडा प्राथमिक असून आज सांयकाळपर्यंत फायनल यादी जाहीर केली जाईल. तसेच, उर्वरित जागांबाबत पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल. याशिवाय राज ठाकरे यांच्या मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असं सतेज पाटील यांनी सांगितलं. तर, वंचित बहुजन आघाडीसोबतही आमची सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
पुण्यात रविवारी रात्री ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात बैठक पार पडली. याचवेळी मनसेच्या नेत्यांनीही या दोन्ही नेत्यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांमध्ये ही महत्त्वाची चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मनसेची भूमिका अद्याप अंतिम झालेली नसून चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, यावेळी सतेज पाटील यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सुरू असलेल्या चर्चेबाबत विचारण्यात आले. यावर, आम्ही गाफील नव्हतो आम्ही दक्ष होतो. आमच्या अंतर्गत चर्चा सुरू होत्या. मनसेसोबत अजूनही चर्चा सुरु आहेत. दुपारपर्यंत सगळं स्पष्ट होईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आल्यास मतांची विभागणी कमी होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आमच्याकडे २९-३० जागा मागितल्या होत्या, पण प्रत्यक्षात मात्र त्यांना १८-२० जागा दिल्या जातील, आज दुपारपर्यंत जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाईल असही बहल यांनी स्पष्ट केलं.






