
महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा कायम
राज्यात उष्णतेचा तडाखा
काही भागांत पाऊस व वादळी वाऱ्याचा इशारा
पुणे/सुनयना सोनवणे: जून महिना सुरू होऊन दोन आठवडे उलटत आले तरी राज्यात मान्सूनची जोरदार सुरुवात अद्याप झालेली नाही. राज्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी बहुतांश भागात उन्हाचा तडाखा कायम असून तापमानात विशेष घट झालेली नाही. हवामानशास्त्र विभागाने रविवारी (ता. १४) राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी (ता.१३) नैऋत्य मान्सूनची उत्तर सीमा १८ अंश उत्तर अक्षांश व ६० अंश पूर्व रेखांशापासून हरनाई, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोठागुडेम, कर्लिगपट्टणम, पारादीप, बारीपाडा, पुरुलिया, धनबाद आणि मुझफ्फरपूरमार्गे पुढे सरकत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये, ओडिशाच्या आणखी काही भागांत तसेच दक्षिण छत्तीसगडमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे.
Raigad News: पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभाग अलर्ट; मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
दरम्यान, राज्यातील काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे. अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यवतमाळमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय रायगड, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: आता ये रे बाबा! राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम; मान्सूनची स्थिती काय?
पुण्यात तापमान कायम
पुणे शहर आणि परिसरात शनिवारी (ता. १३) कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिले, तर संध्याकाळी काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून आले. रविवारी (ता.१४) कमाल तापमानात विशेष बदल अपेक्षित नसून ते ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात किंचित घट होऊन ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाण्याची शक्यता आहे. तसेच आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारनंतर अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.