राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम (फोटो- ai gemini)
मान्सूनची आगेकूच मंदावली
राज्यात पावसाची प्रतीक्षा कायम
काही भागांत येलो अलर्ट
पुणे: राज्यातील अनेक भागांत उकाडा आणि ढगाळ वातावरण कायम असतानाच मान्सूनच्या पुढील प्रगतीचा वेग सध्या मंदावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तर सीमा सध्या १८° उत्तर/६०° पूर्व, १८° उत्तर/६५° पूर्व, १८° उत्तर/७०° पूर्व मार्गे हरणे, सोलापूर, कलबुर्गी, नंदीयाल, चेन्नई तसेच पुढे १५.५° उत्तर/८५° पूर्व, २२° उत्तर/९०° पूर्व, २३.५° उत्तर/९१° पूर्व, २५° उत्तर/९०° पूर्व, सिलिगुडी आणि २७.५° उत्तर/८७.५° पूर्व या भागांतून पुढे जात आहे.
आज उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण कोकण आणि गोवा येथे अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणातील पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा व घाट परिसरासह बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात आकाश अंशतः निरभ्र राहून दुपारनंतर सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. बुधवारी (ता.१०) कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गुरुवारी (ता.११) कमाल तापमान स्थिर राहण्याची, तर किमान तापमानात किंचित घट होऊन ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील अनेक भागांमध्ये मान्सूनने दमदार सुरुवात करत जोरदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल (8 जून) दुपारनंतर सुरू झालेला पाऊस अद्यापही कायम असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसोबत काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गामध्येही समाधानाचे वातावरण आहे.
पुढील तीन ते चार दिवसांत, मान्सून महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये, तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांच्या अनेक भागांमध्ये दाखल होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या मते, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा आणि अरबी समुद्राच्या प्रदेशातील सक्रिय चक्रीवादळी स्थिती आणि विविध द्रोणी प्रणालींमुळे पावसाला चालना मिळत आहे. परिणामी, कोकण, किनारपट्टीचे प्रदेश आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो.






