कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Ambabai Temple) लाखो भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर येथील श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट येथील मोफत भोजनप्रसादाचा लाभ घेतला. उन्हाळी सुट्टीमध्ये अन्नछत्रात साधारणपणे 15 मार्च ते 15 जून या काळात तीन लाखांहून अधिक भाविकांनी भोजनप्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती अध्यक्ष राजू मेवेकरी (Raju Mevekari) यांनी दिली.
दहावी, बारावी आणि माध्यमिक शाळांचा परीक्षा झाल्यानंतर सुट्टीमुळे कोल्हापूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी अन्नछत्रासही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडक उन्हातही प्रसाद घेण्यासाठी अन्नछत्राच्या परिसरात भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या. त्यामुळे अन्नछत्राची वेळ रोज दोन तासाने वाढविण्यात आली.
सुट्टीच्या कालावधीत अन्नछत्रात भोजनप्रसाद बनविण्यासाठी 35 हजार किलो तांदूळ, पाच हजार किलो तूरडाळ आणि मसूर डाळ, साडेपाच हजार किलो खिरीचा गहू, सात हजार किलो गूळ, सात हजार किलो खाद्य तेल, पाच हजार किलो मसाले, दीड हजार किलो मिरची पूड, 500 किलो तूप, ३००किलो काजू व बेदाणे, 14 हजार 500 किलो भाजी, 25 हजार लिटर ताक, 375 व्यावसायिक गॅस सिलेंडर इतके साहित्य लागले.
या सेवेसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्रचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जोशी, राजेश सुगंधी, एस. के .कुलकर्णी, तन्मय मेवेकरी, सुनील खडके, ऋतुराज सरनोबत या संचालकांसह ६० कर्मचारी व २५ स्वयंसेवक कार्यरत होते.