खासदार सावंतांची भाजपवर टीका (फोटो -ani)
अमरावती: उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठी भाषेबद्दल भाष्य केले आहे. 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी भाषेच्या संदर्भात मोर्चा काढणार आहेत. त्यावर देखील खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार अरविंद सावंत हे आज अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार अरविंद सावंत म्हणाले, “महाराष्ट्राला ज्या प्रकारे लाचार सरकार लाभले आहे, ते पाहता उभ्या देशात केंद्र सरकारने शिक्षण नीती म्हणून जे काही घोषित केले आहे, त्यात कुठेही तिसरी भाषा शिकवली पाहिजे असे दिलेले नाही. यामुळे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा आहे.”
पुढे बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, “आम्ही पण शाळेत शिकलो. पाचवीपर्यंत आराठी शाळेत शिकलो. व्यंकय्या नायडू जे देशाचे उपराष्ट्रपती होते ते देखील मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे असा आग्रह करत होते. भारतीय जनता पक्षाच्या कोणालाही मराठीबद्दल काडीचे प्रेम नाही.”
“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्याने दहा वर्षे झगडणारा हा खासदार अरविंद सावंत आहे. उद्धव ठाकरे आणि आज ठाकरे दोन बंधू एकत्र येत आहे. मराठी भाषेचा सक्तीचा जीआर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काढण्यात आला होता. 5 जुलै त्या दिवशी मराठीचा जागर महाराष्ट्राच्या राजधानीत होणार आहे, ” असे खासदार अरविंद सावंत म्हणाले.
सदाभाऊ खोतांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
सध्या राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच, शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी रोखठोक भाषेत मराठी भाषा धोक्यात असल्याचा दावा करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “मराठी भाषा धोक्यात आलेली नाही, तर यातील काहींच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत,” असा टोला त्यांनी लगावला आहे. ५ जुलै रोजी मनसे-शिवसेना एकत्र मोर्चा निघणार आहे, त्यामुळे ही टीका थेट ठाकरे बंधूंवर असल्याची चर्चा आहे.
बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, प्रत्येकाचाच अजेंडा ठरलेला असतो. सध्या अनेकजण मराठीच्या नावाखाली आंदोलन करत आहेत, भाषेची काळजी घेत असल्याचे दाखवतात. पण दुर्दैवाची बाब म्हणजे, शेतकऱ्यांचा अजेंडा मात्र राजकारण्यांच्या दिशेने जाताना दिसत नाही. “शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा यावर कोणी बोलत नाही, पण भाषा धोक्यात आली, असे सांगून खोटा प्रचार केला जातो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.