मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात आहेत; सदाभाऊ खोतांची ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
सध्या राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच, शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी रोखठोक भाषेत मराठी भाषा धोक्यात असल्याचा दावा करणाऱ्यांवर सडकून टीका केली आहे. “मराठी भाषा धोक्यात आलेली नाही, तर यातील काहींच्या खुर्च्या धोक्यात आल्या आहेत,” असा टोला त्यांनी लगावला आहे. ५ जुलै रोजी मनसे-शिवसेना एकत्र मोर्चा निघणार आहे, त्यामुळे ही टीका थेट ठाकरे बंधूंवर असल्याची चर्चा आहे.
बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, प्रत्येकाचाच अजेंडा ठरलेला असतो. सध्या अनेकजण मराठीच्या नावाखाली आंदोलन करत आहेत, भाषेची काळजी घेत असल्याचे दाखवतात. पण दुर्दैवाची बाब म्हणजे, शेतकऱ्यांचा अजेंडा मात्र राजकारण्यांच्या दिशेने जाताना दिसत नाही. “शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा यावर कोणी बोलत नाही, पण भाषा धोक्यात आली, असे सांगून खोटा प्रचार केला जातो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मराठी भाषेच्या अस्तित्वाविषयी व्यक्त होणाऱ्या चिंता हे ढोंग असल्याचे सांगत खोत म्हणाले, “मराठी भाषा टिकून राहणार आहे. पोटाची भूक माणसाला नवी भाषा शिकवते, पण त्यामुळे आपल्या मातृभाषेवर संकट येत नाही. मराठी ही गावी-गावात, दिंड्यांमध्ये, वारीमध्ये आजही जपली जाते.”
आंदोलन करणाऱ्यांना उद्देशून खोत म्हणाले, “तुमच्या मुलांना इंग्रजी येतं का? विमानात बसल्यावर ते मराठीत बोलतात का? कोणत्या मराठी शाळेत शिकले आहेत तुमची मुलं, सांगा त्यांची नावं. त्यांना शिकवणारे शिक्षक आम्हालाही भेटायला हवेत. कारण ही मुलं सरळसरळ इंग्रजी बोलतात आणि मग इथे येऊन भाषेवर उपदेश करतात.”
ते पुढे म्हणाले, “तुमची मुलं चांगल्या इंग्रजी शाळेत जातात, इंग्रजी बोलतात, देश विदेशात फिरतात आणि तुम्ही इकडे मराठीच्या नावाखाली राजकारण करता. ही लढाई भाषेची नाही, ही खुर्च्या वाचवायची लढाई आहे.”
सदाभाऊ खोत यांनी मराठी भाषा जपणाऱ्या खऱ्या लोकांबद्दलही बोलताना, वारीची उदाहरणं दिली. “संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या, वारी, दिंडी ही परंपरा अजूनही टिकून आहे. पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या मुखात आजही पारंपरिक मराठी अभंग आहेत. हीच खरी भाषा जोपासणारी माणसं आहेत. त्यांचं कोणीतरी कौतुक करणार का?” असा सवालही त्यांनी केला.
मराठी टिकून राहणारच आहे, पण त्यासाठी खोटं आंदोलन करण्याची गरज नाही, असं सांगताना त्यांनी शेवटी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, “मराठी भाषा धोक्यात नाही. इंग्रजी शिकणं चुकीचं नाही. माझ्या मुलाने का इंग्रजी शिकू नये? का आमच्या मुलांनी इंग्रजी शिकायचं नाही?”
सदाभाऊ खोतांच्या या वक्तव्यानंतर मराठीच्या राजकारणावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाषेच्या मुद्द्यावर जे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, त्यात खोतांच्या टीकेने अधिक चिमटे घेण्यात आले आहेत. भाषेपेक्षा राजकीय खुर्च्या वाचवण्याचीच ही धडपड आहे, असा दावा त्यांनी केला आहे.