भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत (फोटो सौजन्य-X)
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप होत आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संतप्त होत डॉ. घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकची तोडफोड केली. परंतु, भाजपच्या कार्यकर्त्यांचे अशाप्रकारे व्यक्त होणे त्यांच्या वरिष्ठांना रुचलेले दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट सोशल मीडियवरच शहराध्यक्ष धीरज घाटेंना उल्लेखून पत्र लिहिले असून, या आंदोलनावर टीका केली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपला सविस्तर खुलासा केला आहे. अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती. उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन गेल्याचे स्पष्टीकरणात म्हटले आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले. ‘एका डॉक्टरची मुलगी या नात्याने मी खात्रीपूर्वक सांगू शकते की कुठल्या तरी सोम्या-गोम्या, अर्धा हळकुंडाने पिवळ्याच्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही. शिवाय डॉ. सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेची काही संबंध नसताना केलेली मोडतोडीचे उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे’, असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या गोष्टी बोलल्या गेल्याने भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही यावरही भूमिका स्पष्ट केली. धीरज घाटे म्हणाले, ‘मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी दिले नाही. माध्यमांच्या मार्फत हे पत्र मला समजले. त्यांनी हे पत्र थेट मला द्यायला हवे होते. महिला मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांमुळे त्यांनी पत्र दिले आहे. मात्र, एका महिलेला प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याने महिलांचा रोष हा साहजिक आहे’.
पक्षाच्या बैठकीत त्यांनी बोलायला हवं होतं
‘मेधा कुलकर्णी आणि मी काल स्थापनादिनाच्या कार्यक्रमात भेटलो होतो, त्यावेळी या पत्रासंदर्भात काहीही बोलणे झाले नाही. त्यांनी पक्षाच्या बैठकीत या गोष्टी बोलायला हव्या होत्या. पत्राच्या माध्यमातून सगळ्यांना द्यायला नको होते, मीडियाच्या माध्यमातून हे पत्र मला मिळाले आहे’, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.