ठाणे/ स्नेहा जाधव काकडे : जहाज बांधणीत देशात अग्रगण्य असलेल्या माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मधील माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मुंबईच्या सागरी किनारी असलेली माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) ही कंपनी गेली अडीच शतकांपेक्षा अधिक काळ देशासाठी जहाज, पाणबुडींची बांधणी करत आहे. कंपनीतील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझगांव डॉक कामगार एकता युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहे. 1 जुलै 2025 रोजी माझगांव डॉक कामगार एकता युनियनची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची बहुमताने निवड करण्यात आली.
माझगांव डॉक कामगार एकता युनियनच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांची निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन करण्यासाठी एक छोटेखानी मेळावा ठाण्यातील आनंदआश्रम येथे संपन्न झाला. यावेळी युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत, कार्यध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष समीर चव्हाण, खजिनदार किरण जाधव, उपाध्यक्ष मयुर डेरे, सहखजिनदार चेतन रसाळ, संघटक सिदलार्थ घोडके, ऑफिस सेक्रेटरी गणेश गुरव आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे काम करत आहेत. आज माझगांव गोदी मधील तरुण कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. फिक्स टर्म कॉन्ट्रेक्टवर गेली १६ वर्ष साडेतीन हजार कामगार काम करत आहेत. आज या कामगारांचे वय ४० ते ४५ झाले असून सर्व कामगार कंपनीत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन वेतनाचा करारही होऊ घातला आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास युनियनचे सरचिटणीस सुशांत राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली निवड केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी प्रथम युनियन पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. माझगांव डॉक कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबध्द आहे. कामगारांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सहकार्याने प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.