'मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखव'- दिनेशलाल यादवांचा राज ठाकरेंना खुले आव्हान
Three Language Policy: महाराष्ट्र सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिलापासून हिंदीभाषा सक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध करत २० वर्षांनंतर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावरून राज्य सरकारला थेट इशारा दिला. महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मात्र राज्यभरात मराठी विरूद्ध अमराठी अशा वादाची ठिणगी पडली आहे. या सगळ्यात आता भोजपुरी अभिनेता, गायक आणि राजकीय नेते दिनेश लाल यादव ऊर्फ निरहुओ यांनी थेट राज ठाकरेंना आव्हान दिले आहे.
दिनेश लाल दिनेश लाल यादव उर्फ ’निरहुआ’ यांनी मराठी भाषेच्या वादावरून महाराष्ट्रातील ठाकरे बंधुंना खुले आव्हान देत वादाची ठिणगी टाकली आहे. मराठीऐवजी भोजपुरी भाषेत बोलल्याबद्दल महाराष्ट्रातून हाकलून लावण्याचे आव्हान यादव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (शिवसेना) यांना दिले. मीरा रोड येथील एका रेस्टॉरंट मालकावर मराठी न बोलल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला. या प्रकारावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, भाजप खासदार आणि भोजपुरी अभिनेते दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांनी या प्रकरणावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
एएनआयशी बोलताना निरहुआ म्हणाले, “मला वाटतं की लोक जे काही करतात ते घाणेरडे राजकारण आहे. देशात कुठेही असं घडू नये. हा देश त्याच्या विविध भाषा आणि संस्कृतींसाठी ओळखला जातो, तरीही तो या विविधतेमध्ये एकता राखतो. ही आपल्या देशाची खासियत आहे. मला वाटतं की असे घाणेरडे राजकारण करणाऱ्या लोकांनी असे करण्यापासून परावृत्त व्हावे आणि काळजी घ्यावी.”
हे विभाजनाचे राजकारण आहे. तुम्ही एकत्र येण्याचे राजकारण केले पाहिजे, फुटण्याचे नाही. मला वाटतं की जर कोणात हिंमत असेल तर त्याने मला महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. मला मराठी बोलता येत नाही. मी कोणत्याही नेत्याला खुले आव्हान देतो की जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून लावा. मी मराठी बोलत नाही. मी तिथे राहतो, म्हणून असे घाणेरडे राजकारण करू नये.
बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या
“मी देखील एक राजकारणी आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी असले पाहिजे, त्यांच्या शोषणासाठी नव्हे. कोणाला पाच भाषा शिकायच्या असतील, तर नक्की शिका. हे तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे,” असे निरहुआ यांनी म्हटले.
दरम्यान, प्रसिद्ध अभिनेता रणवीर शोरे यांनी देखील या घटनेचा निषेध करत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, “हे घृणास्पद आहे. राक्षस मोकळेपणाने फिरत आहेत आणि केवळ राजकीय लक्ष वेधण्यासाठी असे प्रकार करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?” या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून मनसेवर टीकेची झोड उठली आहे. आता या मुद्द्यावरून राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.