(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
महाराष्ट्रीय लोकपरंपरेचा जल्लोष, भक्तीभावाची ऊर्जा आणि चित्रपटगृहांमध्ये सुरू असलेला उत्साह यामध्ये आणखी भर घालत ‘गोंधळ’ चित्रपटातील दमदार प्रमोशनल गाणे ‘मल्हारी’ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांकडून येणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे गाणे प्रदर्शित झाले असून, सध्या प्रेक्षकांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली दिसत आहे. हे गाणं पुन्हा एकदा पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या शैलीत बनवण्यात आले असून, या गाण्याला अभिजीत कोसंबी यांचा दमदार आवाज लाभला आहे.
BOX Office Collection Day 4: बॉक्स ऑफिसवर ‘120 बहादूर’ आणि ‘मस्ती 4’ची टक्कर; कोणाची किती कमाई?
‘गोंधळ’ चित्रपटातील ‘मल्हारी’ गाणं प्रदर्शित झालं असून, या गाण्यात श्री खंडोबा देवाचा आविष्कार, भव्य शक्तीचा उत्साह, आणि गोंधळ परंपरेतील ऊर्जामय रंग प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. ‘मल्हारी’ गाण्याला अभिजीत कोसंबी यांचा दमदार आणि भारदस्त आवाज लाभला आहे. या गाण्याला पद्मविभूषण इल्लैयाराजा यांनी संगीत दिले असून संतोष डावखर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. गोंधळाच्या वातावरणात सजलेलं हे गाणं प्रेक्षकांना थेट पारंपारिक गोंधळाचा अनुभव देते.
दिग्दर्शक संतोष डावखर यांनी आपल्या दिग्दर्शनातून लोकपरंपरेला आधुनिक रूप देत तिला जागतिक दर्जावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गोंधळ’ या चित्रपटात महाराष्ट्राच्या संस्कृतीसोबतच गावातील राजकारण व प्रेमी त्रिकोणातून निर्माण झालेले ट्विस्ट प्रेक्षकांना भावत आहे. तसेच चित्रपटातील २५ मिनिटांच्या वनटेक सीनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. वर्ड ऑफ माऊथमुळे हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहाता ‘गोंधळ’चे शोजही वाढवण्यात आले आहेत.
या गाण्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “ ‘मल्हारी’ गाण्याला प्रेक्षक देत असलेली दाद आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ‘गोंधळ’च्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, गोंधळ परंपरा आणि भक्तीभाव मोठ्या पडद्यावर पोहोचवण्याचा आमचा हेतू होता. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. मी सर्व रसिकप्रेक्षकांना आवाहन करतो की, त्यांनी ‘गोंधळ’ चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहावा. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.’’
‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.






