कल्याण : खासदार म्हात्रे यांनी आज कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसर आणि रेल्वे स्टेशनची पाहणी केली. त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन आणि त्याबाहेरील परिस्थिती सुधारावी. आम्ही तुम्हाला तीन वेळा विनंती करू त्यानंतर जी काही कारवाई असेल ती समोरासमोर असेल अशा शब्दांत भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली. तर कपिल पाटील यांनी हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक लढून दाखवा असे आवाहन देखील सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांना दिले.
कल्याण स्टेशन परिसरात स्वच्छता, प्रवशांसाठी प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह, एफओबीवर पंखे बसवणे, वेटींग रूम या प्रश्नांसह स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी उपस्थित रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. ज्याची उत्तरे देताना रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांची अक्षरशः भंबेरी उडल्याचे दिसून आले. कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर स्वच्छतागृहाच्या जागी सलून सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावत तुम्हाला नेमके कशाचे आधुनिकीकरण करायचे आहे? प्रवाशांच्या स्वच्छतागृहापेक्षा सलून इतके महत्त्वाचे आहे का असा संतप्त सवाल केला.
तर कल्याण स्टेशनवरील स्कायवॉक आणि त्यावर बसणारे फेरीवाले, देहविक्रिय करणाऱ्या महिलांमुळे इतर महिलांना माना खाली घालून त्याठिकाणावरून जावे लागत असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. त्यावर खासदार म्हात्रे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता आमची कारवाई सुरू असल्याचे केडीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र या उत्तराने खासदार म्हात्रे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सांगितले की, स्कायवॉकवर एकही फेरीवाला दिसला नाही पाहिजे.
या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना एकदा नाही तर तीनदा विनंती करू. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्याने कारवाई केली नाही, तर चौथ्या वेळी त्या अधिकाऱ्याने आपली बदली करून घ्यावी. कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल अशा शब्दांत खासदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांना खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभेतून पराभूत केले. आजी माजी खासदारांचे आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. कपील पाटील यांची विधानसभा निवडणूक लढण्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर खासदार म्हात्रे यानी कपील पाटील यांना आव्हान केले आहे. हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक लढवून दाखवा. जनता तुम्हाला चारही मुंड्या चित करेल अशी टीका देखील म्हात्रे यांनी केली.
यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन बासरे, विधानसभा सह संघटक रूपेश भोईर, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई, कल्याण पश्चिम कार्याध्यक्ष प्रशांत माळी, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.