सातारा : कोणते मंत्री-संत्री भ्रष्टाचार, खंडणीसंदर्भात काय बोलले मला माहित नाही. तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन आरोप करा. आपण दोघेही चौकशीसाठी ईडीच्या (Enforcement Directorate Office) कार्यालयात जाऊ, असे थेट आव्हान खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत? याचे कारण खंडणी मागितली जात असल्याचा आरोप करत अप्रत्यक्षपणे उदयनराजेंना टोला लगावला होता. त्याला आज उदयनराजेंनी त्यांच्या सिग्नेचर स्टाईलने कॉलर उडवत उत्तर दिले आहे.
खासदार उदयनराजे म्हणाले, माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की, तो ‘घरचा आहेर’ बोलले जाते. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोललं मला माहिती नाही. मंत्री, संत्री असतील. त्याचे मला काहीही घेणे-देणं नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी ईडीला करायला सांगा. उगाच फालतू दोन लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप करू नका.
आपली ‘स्टाईल इज स्टाईल’
एखादा चांगले काम करत असेल तर त्याने कामच करायचे नाही का, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, ‘तुम्ही काम करा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लोक लुटारू आहात, हे एकदा ठरवा. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे. ही लोक पदावरून जातात. त्यावेळी कार्यालयातील स्टाफही त्यांना ओळख देत नाही. पण आपले तसे नाही. आपली स्टाईल इज स्टाईल’, असे म्हणत त्यांनी कॉलर उडवली.