अटल सेतूवर गाडी पार्क केली अन् उडी घेत बँक कर्मचाऱ्याने संपवलं जीवन (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून प्रवास सुखकारक झाला आहे. मात्र या पुलावरून उडी मारून जीव देण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. काही महिन्यापूर्वी ४३ वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाह यांनी अटल सेतूवरून उडी घेत आपले जीवन संपवले होते.त्यानंतर अशीच घटना पुन्हा घडली आहे. एका 35 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने ट्रान्स-हार्बर अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपल्याचे धक्कादायक घटना समोर आली.
ॲलेक्स रेगी असे मृताचे नाव असून तो पुण्याचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीला होता. यासंदर्भात अधिकची माहिती अशी आहे की, रेगीने मंगळवारी आपली कार अटल पुलावर थांबवली आणि समुद्रात उडी मारली. न्हावा-शेवाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रेगीचा मृतदेह नंतर सापडला.
बँक कर्मचारी आपल्या एका नातेवाईकाला भेटण्यासाठी पुण्याहून मुंबईत आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. कामाच्या ताणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. बँक कर्मचाऱ्याचे घर पिंपरी, पुणे येथे आहे. तो एका नामांकित बँकेत कामाला होता. मंगळवारी सकाळी 11.45 वाजता त्यांनी अटल सेतू पुलावरून उडी मारल्याची घटना घडली. कुटुंबीयांचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी ॲलेक्स मुंबईत भेटीसाठी आल्याचे उघड केले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी तो चेंबूरला सासरच्या मंडळींना भेटायला गेला होता आणि अटल सेतू मार्गे पुण्याला परतत असताना पुलावर थांबून त्याने उडी मारली. पुलावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कार थांबल्याचे दिसले, त्यानंतर पाळत ठेवणाऱ्या पथकाने गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली, ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकांनी मृतदेह बाहेर काढला, जो त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
याआधीही जुलै महिन्याच्या अखेरीस एका ३८ वर्षीय अभियंत्याने अटल पुलावर अशाच प्रकारे आपली कार थांबवली होती. यानंतर त्याने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. त्याआधी या अभियंत्याने पत्नी आणि मुलीशीही बोलणे केल्याचे उघड झाले. यानंतर अटल ब्रिज मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्यासाठी उडी मारलेल्या महिलेचे केस पकडून तिला वाचवले. ही घटना 16 ऑगस्ट रोजी घडली.