Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण (photo-social media)
पिंपरी : ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयाचे दुबईला गेलेले ८४ विद्यार्थी आणि ४ प्राध्यापक संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाई क्षेत्राच्या बंदीमुळे दुबईत अडकले होते. मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुबई येथून विमानाने विद्यार्थी आणि शिक्षक मुंबईच्या दिशेने आकाशात झेपावले.
ताथवडे येथील इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेस या शैक्षणिक संस्थेचे ८४ विद्यार्थी आणि ४ प्राध्यापक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दुबईला गेले होते. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाई क्षेत्रातून विमान उड्डाणाला बंदी घातल्याने सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक दुबईत अडकून पडले होते. त्यांच्या सुरक्षित परतीसाठी संबंधित सरकारी अधिकारी आणि यंत्रणांशी विद्यापीठ प्रशासनाने संपर्क साधला. त्याला यश आले असून, विद्यार्थी आणि प्राध्यापक दुबई येथून सुरक्षितपणे निघाले. संबंधित सर्व पालकांना ताथवडे येथे उपस्थित राहण्याची सूचना दिली आहे. मुंबई विमानतळावरून विद्यार्थ्यांना ताथवडे येथे महाविद्यालयात आणले जाणार आहे. तेथे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले.
संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) स्थानिक प्रशासनाने, भारतीय दूतावास, परराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र शासन, पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासन आणि इंदिरा महाविद्यालय प्रशासन यांनी समन्वय साधला. दुबईत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ दिली नाही. त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न केले. याबद्दल समाधान व्यक्त करून पालकांनी तसेच विद्यार्थी, प्राध्यापकांनीही यंत्रणा आणि प्रशासनाचे आभार मानले.
युद्धाचा नवा अंक सुरु
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्या निधनानंतर आता इराणच्या अस्तित्वावरच घाला घालण्याची तयारी सुरू झाली आहे. पश्चिम आशियातील राजकारण पूर्णपणे बदलून टाकणारा एक अत्यंत गोपनीय अहवाल समोर आला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयए (CIA) आता इराणमध्ये लोकशाहीच्या नावाखाली एक मोठा अंतर्गत उठाव घडवून आणण्यासाठी सक्रिय झाली आहे. यासाठी इराणच्या सीमेवर असलेल्या कुर्दिश सैन्याला हाताशी धरून तेहरानमधील सत्ता उलथवून लावण्याची ही ‘हाय-लेव्हल’ रणनीती असल्याचे बोलले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ayatollah Ali Khamenei: शिया राजकारणाचा मेरुमणी कोसळला; इराणला अण्वस्त्रशक्ती बनवणाऱ्या ‘अदृश्य’ सम्राटाचा ‘असा’ होता जीवनप्रवास






