धनंजय मुंडे यांच्यानंतर आता 'या' मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राज्य सरकारवर वाढतोय दबाव (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच संतोष देशमुख हत्येप्रकरणानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर १९९५ मधील एका प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्यानंतरही माणिकराव कोकाटे यांची विधिमंडळ सदस्यता कायम आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसांपासून गाजत आहे.
आता कोकाटेंचा नंबर : दानवे
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर सोमवारी रात्रीच्या सुमारास संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो समोर आले. त्यामुळे मंगळवारी धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा नंबर आहे, असा इशारा दिला आहे.
महायुती सरकार बँक फूटवर
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे महायुती सरकार बँक फूटवर गेल्याने विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. महायुती सरकारची पहिली विकेट आम्ही घेतली. आता दुसरी विकेट याच आठवड्यात काढण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेस तूर्त स्थगिती
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात दोषी आढळल्यामुळे त्यांना २ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती देण्यात आली असली तरी आमदारकी आणि त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची अध्यक्षांच्या दालनात बैठकही झाली.