वसई किल्ल्यात अघोरी कृत्य, मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या पिता पुजारी, मुलाला अटक
वसईच्या किल्ल्यातील हनुमान मंदिरात अघोरी कृत्य करणाऱ्या आणि एका तरुणीवर तसे प्रयोग करुन तिच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या स्वयंघोषीत पुजारी आणि त्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐतिहासिक वसईच्या किल्ल्यात अघोरी प्रकार सुरु असतानाही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पुरातत्व विभागाबाबत वसईकरांनी संताप व्यक्त केला आहे.
वसईतील रेवती निळे नावाच्या तरुणीचे कॉलेजमधील मित्र आयुष राणा याच्याशी प्रेम संबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंधही प्रस्थापित केले होते. मात्र, आयुषच्या वडिलांनी ती खालच्या जातीची असल्याचे सांगून लग्नास विरोध केला होता. पुजारी असलेले आयुषचे वडील अजय राणा यांनी ‘कुंडली जुळत नसल्याचे’ ही कारण देत लग्नास विरोध केला. त्यानंतर प्रियकर आयुषने तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यामुळे रेवतीने नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले होते.
या मंदिरात तो प्रसाद म्हणून मांस खायला देत होता. त्यामुळे मंदिराचे आणि किल्ल्याचे पावित्र्य भंग झाले होते.तो किल्ल्यात अमावस्येच्या रात्री पूजा करायचा. त्यामुळे या सर्व प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी वसईच्या किल्ल्यातील रानटी वनस्पती छाटताना, सफाई करताना किल्ल्याच्या कोणत्याही भागाला धक्का बसू न देण्याची खबरदारी गड-किल्ले प्रेमींना घ्यावी लागते. त्यावर पुरात्तव विभागाकडून लक्ष ठेवले जाते. मात्र, किल्ल्यातील मंदिरावर कब्जा करणाऱ्या आणि त्यात आपले मार्बलचे घर थाटणाऱ्या स्वयंघोषीत अजय राणाकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्वयंघोषीत पुजाऱ्या विरोधात नरबळी, अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादुटोना प्रतिबंधक कायद्यामंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पुजारी ऐतिहासिक वसई किल्ल्यात अघोरी प्रकार आणि जादुटोणा करीत असल्याचे उघड झाले आहे. या पुजाऱ्याने ऐतिहासिक वसई किल्ल्यातील हनुमानाच्या छोट्या मंदिरात कब्जा करुन त्याचा कोणाच्याही परवानगीशिवाय विस्तार केला. त्यात त्याने गॅस, फ्रीज, वॉशींग मशीन, सोफे अशी उपकरणे बसवून संसार सुरु केला होता.
आयुषचे वडील अजय हे वसई किल्ल्यातील हनुमान मंदिरात पुजाऱ्याचे काम करीत असत. त्यांनी या मंदिरात आपले वेगळेच बस्तान बसवले आहे. या किल्ल्यात त्यांनी अघोरी विद्या सुरु केली होती. त्याचा ते रेवतीवरही प्रयोग करीत असत. तुझ्या कुंडलीत मृत्यू योग असल्याचे सांगून अजयने तिच्या हाताला गाठी बांधलेला दोरा बांधणे, वेगवेगळे मंत्र पठण करण्यास देणे, उदी देणे, बॅगेत ठेवायला फुले देणे असे अघोरी प्रयोग सुरु केले होते. या तणावातून रेवतीने उंदिर मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघा पिता-पुत्रांना अटकही केली होती.